पाणथळ जागेवरील प्रस्तावित निवासी संकुलांना विरोध
By कमलाकर कांबळे | Published: March 3, 2024 08:28 PM2024-03-03T20:28:14+5:302024-03-03T20:35:12+5:30
पर्यावरणवाद्यांचे एनआरआयमध्ये वेटलॅण्ड बचाव अभियान
नवी मुंबई : पामबीच मार्गावरील एनआरआय स्थित पाणथळींच्या जमिनी निवासी संकुलांसाठी खुल्या करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. विशेष म्हणजे गेल्या आठवड्यात राज्य सरकारच्या मान्यतेसाठी सादर केलेल्या शहराच्या विकास आराखड्यात याबाबतची तरतूद करण्यात आली आहे. या मुद्यावर शहरातील पर्यावरणप्रेमींनी संताप व्यक्त केला आहे. रविवारी एनआरआय येथील पाणथळ परिसरात एकत्रित येऊन पर्यावरणप्रेमींनी सेव्ह वेटलॅण्डचा नारा दिला.
नवी मुंबईची ‘फ्लेमिंगो सीटी’ अशी ओळख निर्माण केली जात आहे. नेरुळ-सीवूड परिसरात पाम बीच मार्गाच्या खाडीकडील बाजूस असलेल्या पाणथळींच्या ठिकाणी दरवर्षी हजारोंच्या संख्येने फ्लेमिंगो येतात. पर्यावरणप्रेमी पर्यटकांसाठी ही ठिकाणे आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरत आहे. असे असतानाही महापालिकेने विकास आराखड्यात पाणथळींच्या जमिनी निवासी संकुलासाठी खुल्या करण्याचा प्रस्ताव मांडल्याने पर्यावरणप्रेमींनी आक्रमक भूमिका घेतली आहे.
त्याचाच एक भाग म्हणून नवी मुंबई पर्यावरण बचाव समितीचे सुनील अग्रवाल यांच्या नेतृत्वाखाली नेरूळ सीवूडस येथील पाणथळ जागेवर रविवारी सेव्ह वेटलॅण्ड अभियान राबविण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने पर्यावरणप्रेमी उपस्थित होते. विशेष म्हणजे शाळा आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची संख्याही लक्षणीय होती. दरम्यान, पाणथळींच्या जमिनीवर प्रस्तावित निवासी संकुलाचा प्रस्ताव जोपर्यंत विकास आराखड्यातून काढून टाकला जात नाही, तोपर्यंत हे आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार सामाजिक कार्यकर्ते सुधीर दाणी, भारत भूषण गुप्ता, अमिताभ सिंग, अभय वाळुंज आदींनी व्यक्त केला आहे.