चौकशी टाळण्यासाठी उद्योजक न्यायालयात?
By admin | Published: March 25, 2017 01:36 AM2017-03-25T01:36:58+5:302017-03-25T01:36:58+5:30
महापालिकेच्या मालमत्ता विभागातील घोटाळ्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडून चौकशी सुरू असून, सुमारे अद्यापपर्यंत
नवी मुंबई : महापालिकेच्या मालमत्ता विभागातील घोटाळ्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडून चौकशी सुरू असून, सुमारे अद्यापपर्यंत शंभरहून अधिकांची चौकशी झाल्याचे समजते. या प्रकरणात तीन हजार फायलींशी संबंधित असलेल्या तितक्याच जणांची चौकशी होण्याची शक्यता आहे. परंतु त्यात अनेक मोठे उद्योजक असल्यामुळे त्यापैकी काहींनी चौकशी टाळण्यासाठी न्यायालयात धाव घेतल्याचे सूत्रांकडून समजते.
महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी पालिकेच्या मालमत्ता विभागात घोटाळा झाल्याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडे केली आहे. मालमत्ता विभागातील सुमारे तीन हजार फायलींच्या तपासणीतून ६८१ कोटी रुपयांच्या अपहाराची शक्यता निर्माण झाली आहे. त्यानुसार महापालिकेचे निलंबित मुख्य कर संकलक व निर्धारक प्रकाश कुलकर्णी यांच्यासह तिघांविरोधात एनआरआय पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
ठाणे लाचलुचपत प्रतिबंध विभागामार्फत त्यांची चौकशी सुरू असून पुरावे जमा करण्याचे काम सुरू आहे. त्याकरिता कुलकर्णींच्या घरासह काही व्यावसायिक ठिकाणांवर एसीबीने छापे टाकून महत्त्वाचा दस्तावेज ताब्यात घेतला आहे. यामधून त्यांच्या संपत्तीची माहिती उघड करण्याचा प्रयत्न होत आहे. त्याशिवाय अनियमिततेची शक्यता असलेल्या पालिकेच्या तीन हजार फायलींशी संबंधित असलेल्या तितक्याच करदात्यांचीही चौकशी लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडून होण्याची शक्यता आहे. काही उद्योजकांनी एसीबीच्या चौकशीला सामोरे जाण्यास नकार दिला आहे. तर काहींनी थेट न्यायालयात धाव घेवून चौकशी टाळण्याकरिता प्रयत्न चालवले आहे. त्या सर्वच उद्योजकांची चौकशी होवू शकल्यास घोटाळ्यातील महत्त्वाचे सुगावे पोलिसांच्या हाती लागतल. चौकशीला उद्योजकांकडून होत असलेल्या नकारामुळे ठाणे एसीबीच्या पथकापुढे तपासाचे आव्हान वाढत असून तपासकार्याला विलंब होत आहे. परंतु लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या उपअधीक्षक अंजली आंधळे यांनी तपासाची बाब असल्याच्या कारणावरून यासंबंधी माहिती देण्यास नकार दिला.