पनवेल : परदेशावरून परतलेल्या मुलीने व कुटुंबीयांनी होम कोरंटाईनचे नियम पाळले नाहीत म्हणून नवीन पनवेलमधील लहान मुलांचे डॉ मोहिते रुग्णालय बंद ठेवण्याचे आदेश पालिका आयुक्त गणेश देशमुख यांनी सोमवारी दिले. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याच्या दृष्टीने विविध उपाययोजना सुरू असताना परदेश प्रवास करून आलेल्या मुलीची माहिती लपविल्याप्रकरणी आयुक्तांनी हा निर्णय घेतला आहे.
परदेश प्रवासाचा इतिहास असलेल्या व्यक्तीने स्वत:हून अलगीकरण करणे गरजेचे असताना डॉ. महेश मोहिते यांच्या मुलीने १६ मार्च रोजी इंग्लडवरून आल्यानंतर स्वत:ला होम क्वारंटाईन केले नाही. विशेष म्हणजे डॉ मोहिते यांनी देखील हि माहिती पालिकेपासून दडवून ठेवली. घरात होम कोरंटाइनचा व्यक्ती असताना बाहेर वैद्यकीय सेवा देणे हे साथरोग पसरविण्याचा दृष्टीने घातक असल्याचा ठपका ठेवत आयुक्तांनी दवाखाना बंद करण्याचे आदेश दिले़
माझी मुलगी इग्लंडवरून परतल्यावर तिने स्वत:ला होम कोरंटाईन केले होते. विमानतळावरून परतल्यावर मुलीची प्राथमिक तपासणी झाल्यावर संबंधित माहिती पालिकेला प्राप्त झाले असेल, असा माझा समज झाला. मी मुद्दामून कोणतीही माहिती दडविलेली नाही. पालिकेने दिलेल्या सूचनांचा पालन करेन.- डॉ महेश मोहिते
डॉक्टरांची मुलगी परदेशातून आल्यावर त्यांनी स्वत: याबाबत प्रशासनाला माहिती देणे गरजेचे होते. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याच्या दृष्टीने आम्ही युद्धपातळीवर प्रयत्न करत असताना अशा प्रकारे हलगर्जीची शिक्षा अनेकांना भोगावी लागू शकते. यादृष्टीने कारवाई करण्यात आली आहे.- गणेश देशमुख, आयुक्त-पनवेल महानगरपालिका