नवी मुंबई : शहरातील ९२ अनधिकृत बांधकामे तत्काळ खाली करण्याचे आदेश महापालिकेने दिले आहेत. बाजार समितीनेही कांदा - बटाटा मार्केटमधील सर्व व्यापाऱ्यांना गाळे १५ दिवसांमध्ये खाली करण्याची नोटीस दिली आहे. प्रशासनाने नोटीस दिली असली तरी पर्याय नसल्यामुळे जीव मुठीत घेऊन धोकादायक वास्तूंमध्ये राहण्याशिवाय नागरिकांसमोर दुसरा पर्याय शिल्लक राहिलेला नाही. ठाणेमधील कृृष्णा निवास ही तीन मजली इमारत कोसळून १२ ठार व ७ जण जखमी झाल्याची घटना घडल्यानंतर नवी मुंबईमधील अनधिकृत व धोकादायक इमारतींचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. महापालिकेने शहरातील जवळपास ९२ बांधकामे धोकादायक घोषित केली आहेत. या सर्व इमारती तत्काळ खाली करण्याचे आदेश जुलैमध्ये पालिका प्रशासनाने संबंधितांना दिले आहेत. वाशीतील जेएन टाईप व नेरूळमधील अनेक इमारती अनेक वर्षांपासून धोकादायकच्या यादीमध्ये आहेत. सदर इमारती कोणत्याही वेळी कोसळून मोठ्याप्रमाणात जीवितहानी होण्याची शक्यता आहे. येथे राहणाऱ्या नागरिकांसाठी जीव मुठीत घेऊन राहावे लागत आहे. रोजच्या सूर्योदयाबरोबर पुनर्जन्म झाल्यासारखे अनेकांना वाटत आहे. पालिकेने घरे खाली करायला सांगितले असले तरी जायचे कुठे, असा प्रश्न पडत आहे. विकत घेतलेल्या घरांचे कर्जच अजून संपले नाही, मग दुसरीकडे घर कसे घ्यायचे. घर भाड्याने घेतले तरी घर चालवायचे कसे, असा प्रश्न रहिवाशांसमोर आहे. बाजार समितीमधील कांदा - बटाटा मार्केट धोकादायक घोषित करण्यात आले आहे. पालिकेने एपीएमसी प्रशासनास नोटीस दिल्यानंतर बाजार समितीने सर्व व्यापाऱ्यांना मार्केट १५ दिवसांमध्ये खाली करण्याची नोटीस दिली आहे. मार्केटमधील गाळे खाली करा. जर अपघात झाल्यास आम्ही जबाबदार राहणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. प्रशासनाने मार्केट खाली करायला सांगितले असले तरी व्यापारासाठी पर्यायी जागा उपलब्ध करून दिलेली नाही. यामुळे व्यापारी आहेत त्याच स्थितीमध्ये व्यापार करत आहेत. ठाणेमधील दुर्घटनेमध्ये १२ जणांचा बळी गेला आहे, परंतु नवी मुंबईमध्ये वाशी, नेरूळ किंवा एपीएमसीमध्ये दुर्घटना घडली तर मोठ्याप्रमाणात जीवितहानी होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
धोकादायक इमारती खाली करण्याचे आदेश
By admin | Published: August 06, 2015 12:41 AM