नवी मुंबई / मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपत गेलेले गणेश यांचे राजकीय बलस्थान असलेल्या नवी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीतच त्यांची कोंडी करण्यासाठी महाविकास आघाडीचे नेते सरसावले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी झालेल्या बैठकीत त्यावर सविस्तर चर्चा करण्यात आली.
महाविकास आघाडीचा मंगळवारी वाशीत पहिला मेळावा होत असून यावेळी प्रचाराचा नारळ फोडताना जोरदार शक्तिप्रदर्शन केले जाणार आहे. या मेळाव्याला या मेळाव्याला उपमुख्यमंत्री अजित पवार, शिवसेना नेते आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती असेल. तसेच जलसंपदा मंत्री जयंत पाटील, सहकार व कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम, खासदार राजन विचारे हेही या मेळाव्यात सहभागी होणार आहेत.
नवी मुंबई महापालिकेतील सत्तेच्या आधारे गणेश नाईक यांचा तेथील राजकारणावर दीर्घकाळ दबदबा आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून त्यांनी मागील महापालिकेवर आपली सत्ता अबाधीत ठेवली होती. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर गणेश नाईक यांनी राष्ट्रवादीच्या ४८ नगरसेवकांसह भाजपत प्रवेश केला होता. त्यामुळे महापालिकेवर भाजपची सत्ता आली.
विधानसभा निवडणुकीनंतर भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसची महाविकास आघाडी अस्तित्वात आली. त्यानंतर गणेश नाईक यांच्या वर्चस्वाला शह देण्यासाठी नवी मुंबईतही महाविकास आघाडीचा प्रयोग राबवण्याच्या हालचालींना वेग आला. त्याची सुरूवात म्हणून मंगळवारी आघाडीचा पहिला मेळावा वाशीच्या विष्णुदास भावे नाट्यगृहात होणार आहे.९ मे २0२0 रोजी नवी मुंबई महापालिकेची मुदत संपुष्टात येत आहे. त्यामुळे एप्रिलच्या दुसऱ्या किंवा तिसºया आठवड्यात निवडणुका होण्याची शक्यता आहे. आतापर्यंत परस्परांविरोधात लढणाऱ्या तिन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांत मनोमिलन व्हावे, यासाठी तसेच कार्यकर्त्यांत संवादासाठी या मेळाव्यातून प्रयत्न केले जातील.
शरद पवारांनी घेतला आढावा
राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी सोमवारी मुंबईत बैठक घेऊन नवी मुंबई पालिका निवडणुकीबाबत नेमके काय करता येईल, यावर तिन्ही पक्षांच्या नेत्यांशी चर्चा केल्याची माहिती शशिकांत शिंदे यांनी दिली. यावेळी शिवसेनेतर्फे एकनाथ शिंदे, तर काँग्रेसतर्फे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात उपस्थित होते. तिन्ही नेत्यांच्या चर्चेत उद्याचा मेळावा, आघाडीचे स्वरूप, जागावाटप यावर प्राथमिक चर्चा झाल्याचे समजते.