सर्व यंत्रणांना ‘मॉक ड्रील’चे आदेश

By admin | Published: May 12, 2016 02:13 AM2016-05-12T02:13:58+5:302016-05-12T02:13:58+5:30

येणाऱ्या पावसाळ्यात आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास मदत व बचाव कार्य तातडीने सुरू होऊन आपदग्रस्तांना मदत मिळणे आवश्यक असल्याने आपत्कालीन

Order for 'Mock Drill' to all the systems | सर्व यंत्रणांना ‘मॉक ड्रील’चे आदेश

सर्व यंत्रणांना ‘मॉक ड्रील’चे आदेश

Next

अलिबाग : येणाऱ्या पावसाळ्यात आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास मदत व बचाव कार्य तातडीने सुरू होऊन आपदग्रस्तांना मदत मिळणे आवश्यक असल्याने आपत्कालीन परिस्थितीला सक्षमपणे तोंड देता यावे यासाठी सर्व प्रशासकीय यंत्रणांनी सतर्क रहावे. तसेच संभाव्य आपत्तीजन्य परिस्थितीला तोंड देण्यासाठी सर्व यंत्रणांची मॉक ड्रील (उपाययोजना प्रात्यक्षिक) करु न त्याचा आढावा घ्यावा व त्रुटी आढळल्या तर त्या तातडीने दुरूस्त करुन घ्याव्यात, असे आदेश रायगडच्या जिल्हाधिकारी शीतल तेली-उगले यांनी बुधवारी येथे दिले आहेत.
रायगड जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या मान्सूनपूर्व तयारी आढावा बैठकीचे आयोजन जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात करण्यात आले होते, त्यावेळी जिल्हाधिकारी तेली-उगले बोलत होत्या. त्या म्हणाल्या, जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार यांनी त्यांच्या क्षेत्रात उद्भवणाऱ्या संभाव्य आपत्कालीन परिस्थितीनुसार आपत्कालीन व्यवस्थापन आराखडा तयार करावा, त्याचबरोबर ग्रामपंचायत स्तरावरही तेथील परिस्थितीनुसार आपत्ती आराखडा तयार करावा. आपत्कालीन परिस्थितीत तातडीने मदत व बचाव कार्य सुरू करु न आपदग्रस्तांना मदत देणे महत्वाचे आहे. त्यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी त्यांच्याकडील असलेली साधनसामुग्री सुस्थितीत ठेवावी, असेही त्यांनी सांगितले.
जिल्ह्यातील वैद्यकीय यंत्रणेने पुरेसा औषधसाठा उपलब्ध करुन ठेवावा तसेच रुग्णवाहिका तात्काळ उपलब्ध होतील याचे नियोजन करावे. स्थलांतरीत आपदग्रस्तांना तात्पुरता निवारा देण्यासाठी जिल्ह्यातील शाळा सुस्थितीत ठेवाव्यात. त्यामध्येही आवश्यक ती दुरूस्ती करुन घ्यावी. जिल्ह्यातील सर्व ठिकाणी पुरेसे अन्नधान्याचा योग्य पुरवठा होण्यासाठी जिल्हा पुरवठा विभागाने योग्य नियोजन करावे. तहसीलदारांनी त्यांच्या क्षेत्रातील सर्व गोदामांचा आढावा घेऊन ती सुस्थितीत ठेवावीत. वाहतूक व्यवस्था सुरळीत राहील यासाठीही प्रादेशिक परिवहन कार्यालयाने योग्य ती दक्षता घ्यावी. सर्व ठिकाणची पर्जन्यमापक यंत्र सुस्थितीत ठेवावेत अशाही सूचना त्यांनी दिल्या.
या बैठकीस रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप पांढरपट्टे, निवासी उपजिल्हाधिकारी सतीश बागल, उपजिल्हाधिकारी (सा.प्र.) किरण पाणबुडे, अलिबाग प्रांत सर्जेराव सोनवणे, पेण प्रांताधिकारी प्रेमलता जैतू, पनवेल प्रांताधिकारी भरत शितोळे, कर्जत प्रांताधिकारी दत्ता भडकवार, रोहा प्रांताधिकारी सुभाष भागडे आदी अधिकारी उपस्थित होते.

Web Title: Order for 'Mock Drill' to all the systems

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.