नामदेव मोरे
नवी मुंबई : समाज विकास विभागातील दप्तर दिरंगाईचा फटका नवी मुंबईमधील सर्वसामान्य नागरिकांना बसला आहे. कॅन्सर व क्षयरोग झालेल्या महिलांना उपचारासाठीचे अनुदान वेळेत देण्यात आलेले नाही. विधवा महिलांच्या मुलींच्या लग्नासाठी व इतर योजनांचे अनुदानही संबंधित लाभार्थ्यांना देण्यात आलेले नाही.
नवी मुंबई महानगरपालिकेच्या समाज विकास विभागाच्या वतीने गरिबांसाठी विविध योजना राबविण्यात येतात. कॅन्सर, एचआयव्ही व क्षयरोग झालेल्या महिलांना उपचारासाठी २५ हजार रुपये अनुदान देण्यात येते. विधवा महिलांना त्यांच्या मुलीच्या लग्नासाठी ६५ हजार रुपये अनुदान देण्यात येते. सुतारकाम व प्लबिंगचा व्यवसाय सुरू करण्यासाठी ५० हजार रुपये दिले जातात. विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती देण्यात येते, परंतु सहा महिन्यांपासून या योजनांच्या लाभार्थ्यांना त्यांच्या हक्काचे पैसे देण्यात आलेले नाहीत.
या विभागामध्ये उपायुक्त म्हणून काम करणाऱ्या अमोलकुमार यादव यांची आठ महिन्यांपूर्वी बदली झाली आहे. त्यांच्या जागेवर क्रांती पाटील यांची नियुक्ती झाल्यापासून या विभागाचे काम धिम्या गतीने सुरू आहे. ३१ मार्चपूर्वी सर्व योजनांची रक्कम संबंधित लाभार्थ्यांना वाटप होणे आवश्यक होते, परंतु विविध कारणांनी फाइलवर संबंधित कर्मचारी व अधिकाऱ्यांनी सह्या केल्या नाहीत. वेळेत निर्णय घेतले असते, कोरोनाचे संकट सुरू होण्यापूर्वी सर्व लाभार्थ्यांना त्यांच्या हक्काची रक्कम मिळाली असती.
कोरोनाची साथ सुरू झाल्यानंतर प्रत्येक विभागामधील कर्मचाºयांना आरोग्य विभागातील कामाची जबाबदारी देण्यात आली आहे.समाज विकास विभागातील समूह संघटकांनाही आरोग्य केंद्रातील जबाबदारी देण्यात आली आहे. अनेक लाभार्थ्यांच्या अर्जांची छाननी व इतर कामे अपूर्ण आहेत. कर्मचारी कोरोनाविषयी कामामध्ये व्यस्त असल्याचे भासविले जात आहे, परंतु प्रत्यक्षात समूह संघटकांनी काही महिन्यांपूर्वीच सर्व अर्ज जमा केले आहेत.
कार्यालयातील लेखनिक, समाजसेवक, समाज विकास अधिकारी व उपायुक्त स्तरावर काम रखडले आहे. कोरोनाच्या संकटात कॅन्सर, एचआयव्हीसारख्या आजाराशी लढणाºया महिलांकडे उपचार व घरखर्चासाठी पैसे नाहीत. मनपाकडे वारंवार मागणी करूनही अनुदान वेळेवर दिले जात नाही. यामुळे आम्ही उपचाराशिवाय व उपाशीच जीवन जगायचे का, असा प्रश्न वंचित लाभार्थी विचारू लागले आहेत. याविषयी माहिती घेण्यासाठी उपायुक्त क्रांती रेडकर यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी सर्व लाभार्थ्यांना योजनांचा लाभ देण्याची प्रक्रिया सुरू आहे. काहींचे चेक तयार केले आहेत. लवकरच सर्वांना लाभ देण्याचे प्रयत्न असल्याचे स्पष्ट केले आहे.दोषींवर कारवाई करण्याची मागणीमार्च महिन्यापूर्वी समाज विकास विभागाच्या योजनांचा लाभ संबंधितांना मिळणे आवश्यक होते. अनेक महिन्यांपासून अर्ज प्रलंबित असून, दप्तर दिरंगाईमुळे विधवा महिला, कॅ न्सर व इतर आजार झालेल्या महिला, गरिबांना लाभापासून वंचित राहावे लागले आहे. ज्यांच्यामुळे सामान्यांना योजनांपासून वंचित राहावे लागले, त्यांच्यावर कारवाईची मागणी होत आहे.निधीवर कात्री नको : कोरोनामुळे अनेक विभागांतील खर्चावर मर्यादा घातली आहे. महानगरपालिकेने समाज विकास विभागाच्या खर्चावर कात्री लावू नये. गरिबांना त्यांच्या हक्काचे पैसे देण्यात यावेत. गतवर्षीच्या योजनांचा आठ दिवसांत निपटारा करण्यात यावा व पुढील वर्षासाठीच्या योजनांसाठीही कार्यवाही लवकर सुरू करावी, अशी मागणी करण्यात येत आहे.समाज विकास विभागाच्या माध्यमातून विधवा महिला इतरांसाठीच्या योजनांचा लाभ संबंधितांना देण्यासाठीची कार्यवाही सुरू आहे. काहींचे धनादेश देण्यात आले असून, उर्वरित लाभार्थ्यांना लवकरच वाटप केले जाणार आहे. - क्रांती रेडकर, उपआयुक्त, समाज विकास विभाग