म्हसळा : दानाचे अनेक प्रकार आहेत. काही दानात पुण्य मिळते तर आपले शरीरातील अवयवदान केल्याने दुसऱ्याला नवसंजीवनी देता येते, हे केवळ अवयवदान केल्यानंतर होते, असे मत श्रीवर्धन उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.मधुकर ढवळे यांनी व्यक्त केले. अवयवदानासाठी आयोजित जनजागृती कार्यक्र मात ते बोलत होते.अवयवदान मृत्यूपूर्वी (ब्रेनडेथ) पेशंट व मृत्यू (डेथबॉडी) नंतरही करू शकतो ते कशाप्रकारे करता येते याची माहिती डॉ.ढवळे यांनी दिली.कार्यक्र माला प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस उपविभागीय अधिकारी बब्रुवान कल्लुलकर, नेत्र चिकित्सक डॉ. सलीम ढलाईत, मराठा प्रतिष्ठानचे अध्यक्ष काशिनाथ गुरव, उपाध्यक्ष रशिश माने आदी उपस्थित होते. यावेळी उपस्थित मराठी संस्कृती प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी फॉर्म भरून अवयवदान करण्याचे निश्चित करून कार्यक्र मात मोठे योगदान दिले. त्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. डॉ.एम.डी.ढवळे व डॉ.सलीम ढलाईत यांनी वैद्यकीय माहिती देताना ब्रेनडेथ पेशंट व डेथ बॉडी यामधील फरक समजावून ब्रेनडेथ पेशंटचे किडनी, हृदय, यकृत व इतर अवयव दुसऱ्या गरजवंताला कसे कामी येतात हे विस्तृतपणे सांगितले. डीवायएसपी कल्लुलकर यांनी अवयवदान करण्यासाठी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण कशी करावी आणि अवयवदान गरजेचे का आहे याबाबत मार्गदर्शन केले. (वार्ताहर)
अवयवदान केल्याने दुसऱ्याला नवसंजीवनी मिळते
By admin | Published: September 08, 2016 3:07 AM