पनवेल महापालिका आयुक्तांच्या समर्थनासाठी संघटनांचा एल्गार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2018 02:57 AM2018-02-23T02:57:35+5:302018-02-23T02:57:46+5:30
पनवेल महपालिकेच्या स्थापनेला सुमारे एक ते दीड वर्षाचा कालावधी लोटला आहे. सुरु वातीला सत्ताधारी व प्रशासनाकडून एकत्रित काम सुरू होते.
पनवेल : पनवेल महपालिकेच्या स्थापनेला सुमारे एक ते दीड वर्षाचा कालावधी लोटला आहे. सुरु वातीला सत्ताधारी व प्रशासनाकडून एकत्रित काम सुरू होते. मात्र गेल्या चार-पाच महिन्यांपासून आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे व सत्ताधारी यांच्यात अनेकदा वाद निर्माण झाले आहेत. त्यामुळे आयुक्तांच्या बदलीचा विषय समोर येत आहे. आयुक्तांच्या समर्थनार्थ शहरातील सामाजिक संघटनांनी आवाज उठवण्यास सुरुवात केल्याने ठाकूरशाही विरोधात सामान्य जनता असा संघर्ष पाहायला मिळत आहे.
नुकत्याच पार पडलेल्या पनवेलच्या महासभेत सत्ताधाºयांकडून प्रशासनावर गंभीर आरोप करण्यात आले. प्रशासनाकडून कामे होत नसल्याचा ठपका या वेळी ठेवण्यात आला. त्यामुळे आयुक्तांसह अधिकाºयांनी सभात्याग केला. आयुक्तांच्या बदलीवरही गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा सुरू आहे. महापालिकेतील सत्ताधारी व आयुक्तांमध्ये निर्माण झालेल्या वादात आयुक्तांच्या समर्थनार्थ पनवेलमधील सिटीझन युनिट फोरम (कफ), पनवेल महानगर पालिका संघर्ष समिती या संघटना पुढे आल्या आहेत. कफ या संघटनेने आयुक्तांच्या बदलीविरोधात सह्यांची मोहीम हाती घेतली असून जवळपास १२०० जणांच्या सह्यांचे पत्र संघटनेने मुख्यमंत्र्यांना दिले आहे. याशिवाय आयुक्तांची बदली थांबविण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असून वेळ पडल्यास रस्त्यावरही उतरू, असेही कफचे अध्यक्ष अरुण भिसे यांनी सांगितले. आयुक्तांच्या भूमिकेमुळे कदाचित सत्ताधाºयांची आर्थिक कोंडी होत असेल म्हणूनच आयुक्तांच्या विरोधात भूमिका घेतली असल्याचा संशय व्यक्त केला आहे. पनवेल महापालिका संघर्ष समितीच्या माध्यमातून आयुक्त डॉ . सुधाकर शिंदे यांच्या समर्थनार्थ ‘पनवेल बचाव’ ही मोहीम हाती घेत शनिवारी शासकीय विश्रामगृहात बैठक बोलावून या संदर्भात रणनीती ठरविली जाणार आहे.
खारघर शहरातून देखील आयुक्तांच्या समर्थनार्थ नागरिक पुढाकार घेत असून विविध मोहीम राबविण्यास येत आहे. स्वच्छ सर्वेक्षणात आयुक्त चांगले काम करीत आहेत, असे मराठी फाउंडेशनचे मंगेश रानवडे यांनी सांगितले आहे.