शहरात ४१ महत्त्वाच्या दहीहंड्यांचे आयोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2017 02:24 AM2017-08-14T02:24:54+5:302017-08-14T02:24:59+5:30

शहरात दहीहंडी आयोजकांची तयारी अंतिम टप्प्यात आली असून, गोविंदा पथकांचाही सराव पूर्ण झाला आहे

Organizing 41 important dahihandas in the city | शहरात ४१ महत्त्वाच्या दहीहंड्यांचे आयोजन

शहरात ४१ महत्त्वाच्या दहीहंड्यांचे आयोजन

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नवी मुंबई : शहरात दहीहंडी आयोजकांची तयारी अंतिम टप्प्यात आली असून, गोविंदा पथकांचाही सराव पूर्ण झाला आहे; परंतु न्यायालयाकडून करण्यात आलेल्या सूचनांचे पालन करण्याची सक्त ताकीद पोलिसांकडून दहीहंडी आयोजकांना करण्यात आली आहे. यामुळे आयोजकांसह गोविंदा पथकांच्या उत्साहात विरजण आल्याचे पाहायला मिळत आहे.
मुंबई पाठोपाठ नवी मुंबईतील गोविंदा राज्यभर चर्चेचा विषय बनलेला आहे. दहीहंडी आयोजकांकडून लावण्यात आलेली लाखोंची बक्षिसे व मानाच्या हंडी फोडण्यासाठी गोविंदा पथकांकडून सर्वाधिक थर लावण्याची सुरू असलेली स्पर्धा हा त्यातला महत्त्वाचा भाग मानला जातो; परंतु मागील काही वर्षांत दुर्घटनांमुळे उत्सवाला गालबोट लागले आहे. यामुळे न्यायालयाकडून विविध प्रकारे उत्सवावर नियमांचे बंधन येऊ लागल्याने दहीहंडीचा उत्साह मावळत चालल्याचे पाहायला मिळत आहे.
मागील दोन वर्षांत नवी मुंबई पोलिसांनीही शहरात होणाºया दहीहंडी उत्सवाला नियमांच्या रेषेत आणण्याचे काम केलेले आहे. त्यामुळे रस्त्यावरील मोठ्या हंड्या लगतच्या मैदानात हलवल्या गेल्याने वाहतूककोंडीचा प्रश्न मिटला आहे. त्यानुसार यंदाही पोलिसांकडून न्यायालयाच्या आदेशांवर बोट ठेवत, त्यांचे पालन करण्याच्या सक्त सूचना दहीहंडी आयोजक व गोविंदा पथकांना केल्या आहेत. त्याशिवाय ध्वनिप्रदूषण होणार नाही, याकरिता आवाजाची मर्यादाही पाळण्याच्या सूचना पोलिसांकडून करण्यात आल्या आहेत.
रस्त्यावरील हंड्यांना परवानगी देण्याचे बंद झाल्याने मागील दोन वर्षांत शहरातील अनेक हंड्या रद्द झाल्या आहेत. यंदाही काही हंड्या रद्द झाल्या असून, अद्यापपर्यंत महत्त्वाच्या ४१ हंड्यांची नोंद पोलिसांकडे झाली आहे. तर यंदा स्वातंत्र्यदिन व दहीहंडी एकाच दिवशी आल्यामुळे उत्सवप्रेमींचा आनंद द्विगुणित
झाला आहे. उत्सवाला गालबोट लागू नये, याकरिता पोलिसांकडून
पुरेशी खबरदारी घेण्यात आली
आहे.
शहर पोलिसांसह वाहतूक पोलीसही बंदोबस्तावर नेमण्यात आले आहेत. प्रत्येक पोलीसठाण्यांतर्गत गोविंदा पथके व दहीहंडी आयोजकांची बैठक घेऊन कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही, याची खबरदारी घेण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.
>शहरात ४१ महत्त्वाच्या हंड्यांची नोंद झालेली असून, आयोजकांसह गोविंदा पथकांना न्यायालयाचे आदेश पाळण्याच्या सूचना केल्या आहेत. ध्वनिप्रदूषण होणार नाही, याचीही खबरदारी घेण्याचे सूचित करण्यात आले आहे. यादरम्यान कायद्याचे उल्लंघन करणाºयांवर सक्त कारवाई केली जाईल.
- डॉ. सुधाकर पठारे,
उपआयुक्त-परिमंडळ-१.

Web Title: Organizing 41 important dahihandas in the city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.