‘तू माझा स्वाभिमान’चे आयोजन
By Admin | Published: December 22, 2016 06:37 AM2016-12-22T06:37:15+5:302016-12-22T06:37:15+5:30
‘जगणे पुरे झाले जगवायचे आता, आयुष्य एकवार फुलवायचे आता’ असे म्हणत आयुष्याचा आनंद घेणारे आणि देणारे पालक
नवी मुंबई: ‘जगणे पुरे झाले जगवायचे आता, आयुष्य एकवार फुलवायचे आता’ असे म्हणत आयुष्याचा आनंद घेणारे आणि देणारे पालक, कुटुंबातील इतर ज्येष्ठ मंडळी मुलांना चांगले जीवन आणि भविष्य देण्यासाठी स्वत:च्या आवडी-निवडी आणि गरजा बाजूला सारतात. कुटुंब हा प्रत्येकाच्या आयुष्याचा मुख्य पाया असतो, ज्यावर आपले करिअर आणि भविष्य अवलंबून असते. त्यात आईची भूमिका ही जरा जास्त संवेदनशील असते. कर्तव्य आणि प्रेम याचा सुरेख संगम साधणे हे केवळ आईलाच जमते. हाच विषय घेऊन कलर्स प्रस्तुत ‘एक शृंगार... स्वाभिमान’ ही नवी मालिका कलर्सने आणली असून, ‘लोकमत’ सखी मंचाच्या माध्यमातून एक सुंदर विषय स्पर्धेच्या रूपाने आपल्या भेटीला येत आहे. माय-लेकीच्या नात्याची वीण घट्ट करण्यासाठी, ‘आम्ही दोघी माय-लेकी’ ही स्पर्धा आयोजित करण्यात आली असून, शुक्रवार २३ डिसेंबर रोजी झुलेलाल मंदिर सभागृह, पहिला मजला, वाशी बसडेपोच्या मागे, सेक्टर ९/ ए , वाशी येथे सायंकाळी ५.३० वाजता हा कार्यक्रम पार पडणार आहे.
गोवा आणि महाराष्ट्रात लोकमत सखी मंचतर्फे सदस्यांसाठी वर्षभर कार्यक्रमांची रेलचेल असते. वैविध्यपूर्ण कार्यक्रमांमुळे सखी मंचने आपले वेगळे स्थान निर्माण केले, तसेच कलर्सनेदेखील प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. ‘तू माझा स्वाभिमान’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून कलर्स व लोकमत सखी मंच आपल्या भेटीला येत आहे. या कार्यक्रमास माय-लेकीसाठी विविध स्पर्धा होतील. सुरुवातीला त्यांनी परिचय फेरीमध्ये एकमेकींचा परिचय करून घ्यायचा आहे. त्यानंतर, कलाविष्कार फेरी आणि परिस्थितीनुरूप निर्णयक्षमता व प्रश्नोत्तर फेरी होईल. आई व मुलीची एकमेकांप्रति असलेली बांधिलकी, जवळीक, त्यांच्या नात्यातील तरलता, एकमेकींना सांभाळण्याचे कसब या स्पर्धेत दिसून येईल आणि माय-लेकीचे नाते अजून घट्ट होईल. एकूणच नात्यातील ओलावा जपणारा हा कार्यक्रम असणार आहे. स्पर्धेबरोबरच प्रेक्षकांमध्ये हशा पिकवण्यासाठी ‘बाबुराव मस्तानी’चे विविध कलाकार कॉमेडीच्या माध्यमातून धमाल-मस्ती करणार आहेत.
कलर्स चॅनेलवर १९ डिसेंबरपासून सोमवार ते शुक्रवार रात्री ९.३० वाजता ‘एक शृंगार... स्वाभिमान’ ही आई व मुलींच्या नात्यांवर आधारित मालिका सुरू झाली आहे. या मालिकेत गणिताची शिक्षिका असणाऱ्या शारदाने तिच्या दोन मुलींना पुढारलेल्या विचारांसह स्वाभिमानाने जगण्याचा मंत्र दिला आहे. मुलींना कर्तृत्ववान बनविल्यानंतर, तिची नोकरी आधी आणि घर नंतर या विषयावर काम शारदा समाजासमोर अनेक प्रश्न निर्माण करते. ज्यात नोकरी करणे म्हणजे फक्त अर्थार्जन नव्हे, तर स्वाभिमानाने जगण्याचा तो एक मार्ग आहे, असे तिला सांगावे वाटते. घर सांभाळून नोकरी करणारी स्त्री आदर्श आणि नोकरीसाठी करिअरला जास्त महत्त्व देणारी स्त्री ही आदर्श का नाही, असा प्रामाणिक प्रश्न शारदा विचारते. तिच्या या सर्व प्रश्नांना काय उत्तरे आहेत, हे मालिकेमध्ये कळेलच, पण ‘आम्ही दोघी माय-लेकी’ या स्पर्धेतूनसुद्धा या विषयांवर प्रकाश टाकला जाईल. या स्पर्धेसाठी माय-लेकींच्या जोड्या आमंत्रित आहेत. यात मुलीचे वय कमीत कमी १५ वर्षे असावे. स्पर्धेसाठी आधी नोंदणी करावी लागेल. प्रथम नोंदणी करणाऱ्या १५ जोड्यांना प्राधान्य. विजेत्यांना आकर्षक बक्षिसे देण्यात येतील.
या बोचऱ्या थंडीत आई आणि मुलींच्या विविध स्पर्धा रंगतील आणि त्यांच्या नात्यातील वीण अधिक घट्ट होईल. त्यांच्या प्रेमाचा रंग , एकमेकांचा स्वाभिमान जपण्याची धडपड या कार्यक्रमात दिसेल. तसेच सखींसाठी खास बहारदार लावणीचे आयोजन करण्यात आले आहे. येणाऱ्या प्रत्येक सखीस एक भेटवस्तू देण्यात येईल.
कार्यक्रम सर्व सखी मंचसाठी खुला असून, परिवारासहीत सदस्य सादर आमंत्रित अधिक माहिती , नोंदणीसाठी ९१६७७९०४७६ या क्रमांकावर संपर्क साधावा.
(प्रतिनिधी)