संविधान दिनानिमित्त विद्यार्थ्यांसह नागरिकांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन; महापालिकेचा उपक्रम

By योगेश पिंगळे | Published: November 12, 2022 04:13 PM2022-11-12T16:13:12+5:302022-11-12T16:13:52+5:30

नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने संविधान दिनाचे औचित्य साधून ‘निबंध, वक्तृत्व व घोषवाक्य स्पर्धा’ आयोजित करण्यात आले आहे.

organizing various competitions for students and citizens on the occasion of constitution day navi mumbai municipal initiative | संविधान दिनानिमित्त विद्यार्थ्यांसह नागरिकांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन; महापालिकेचा उपक्रम

संविधान दिनानिमित्त विद्यार्थ्यांसह नागरिकांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन; महापालिकेचा उपक्रम

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

नवी मुंबई: भारतीय संविधानातील मौलिक तत्वे, मूलभूत अधिकार आणि कर्तव्ये स्वतंत्र भारताच्या नागरिकांना संस्कारीत करणारी आहेत. यादृष्टीने भारतीय संविधानाविषयी विद्यार्थी आणि नागरिकांमध्ये जाणीव, जागृती व्हावी याकरिता नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने २६ नोव्हेंबर रोजीच्या संविधान दिनाचे औचित्य साधून ‘निबंध, वक्तृत्व व घोषवाक्य स्पर्धा’ आयोजित करण्यात आले आहे.

नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील विद्यार्थी आणि नागरिक यांच्याकरिता आयोजित या स्पर्धांकरिता भारतीय संविधानाचे महत्त्व, माझे संविधान, माझा अभिमान आणि संविधान निर्मिती आणि बाबासाहेब - असे तीन विषय देण्यात आलेले आहेत. ‘निबंध स्पर्धा’ मध्ये या तीन विषयांपैकी एका विषयावर मराठी, हिंदी, इंग्रजी भाषेत निबंध सादर करता येतील. चार गटांमध्ये निबंध स्पर्धा घेण्यात येत असून इयत्ता ५ वी ते ८ वी चा प्राथमिक शालेय गट, इयत्ता ९ वी व १० वी चा माध्यमिक शालेय गट यांच्या स्पर्धा आयोजनाचे नियोजन महापालिकेच्या शिक्षण विभागामार्फत करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे महाविद्यालयीन व खुल्या गटाच्या स्पर्धांचे नियोजन समाजविकास विभागामार्फत करण्यात येत आहे. 

निबंधाकरिता कमाल शब्दमर्यादा प्राथमिक शालेय गटाकरिता ३०० शब्द, माध्यमिक शालेय गटाकरिता १००० शब्द, महाविद्यालयीन गटाकरिता १००० शब्द व खुल्या गटाकरिता २००० शब्द इतकी आहे. ‘घोषवाक्य स्पर्धा’ प्राथमिक शालेय गट, माध्यमिक शालेय गट, महाविद्यालयीन गट तसेच खुला गट या चारही गटांमध्ये आयोजित करण्यात आली असून संविधानविषयक मराठी, हिंदी, इंग्रजी यापैकी कोणत्याही भाषेतील एक घोषवाक्य स्पर्धक सादर करू शकतात. ‘वक्तृत्व स्पर्धा’ प्राथमिक शालेय गट, माध्यमिक शालेय गट अशा दोन गटात घेण्यात येणार असून मराठी अथवा हिंदी भाषेतील सादरीकरणाचा कालावधी कमाल पाच मिनिटे असणार आहे. प्रत्येक गटातील निवडक स्पर्धकांची अंतिम फेरी ऐरोली येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथे २५ नोव्हेबर रोजी संपन्न होणार आहे.

प्रत्येक स्पर्धेकरिता प्रत्येक गटातील पाच विजेत्यांना रोख पारितोषिके आणि प्रशस्तिपत्रे प्रदान करण्यात येणार असून या स्पर्धांमध्ये नवी मुंबई महापालिका क्षेत्रातील शाळा, महाविद्यालयांमधील विद्यार्थी व नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होत भारतीय संविधनाविषयी आपल्या मनात असलेला अभिमान, त्याचे महत्व अधोरेखित करावे. राजेश नार्वेकर, आयुक्त, न.मुं.म.पा.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: organizing various competitions for students and citizens on the occasion of constitution day navi mumbai municipal initiative

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.