पालिकेच्या ईटीसीचा पॅटर्न राबवणार ओरिसा सरकार
By admin | Published: May 2, 2017 03:26 AM2017-05-02T03:26:44+5:302017-05-02T03:26:44+5:30
सर्व प्रकारच्या दिव्यांगांना सामावून घेणारा देशातील एकमेव नवी मुंबई महापालिकेचा ईटीसी पॅटर्न ओरिसा सरकार राबवणार
नवी मुंबई : सर्व प्रकारच्या दिव्यांगांना सामावून घेणारा देशातील एकमेव नवी मुंबई महापालिकेचा ईटीसी पॅटर्न ओरिसा सरकार राबवणार आहे. त्याकरिता ओरिसा राज्याचे सामाजिक सुरक्षा, दिव्यांग व्यक्ती सक्षमीकरण विभाग आणि युनिसेफ यांच्या संयुक्त विद्यमाने दोन दिवसीय अभ्यासदौरा करण्यात आला. या वेळी त्यांनी ईटीसी केंद्राच्या संपूर्ण कामकाजाची माहिती ज्ञात करून घेतली.
नवी मुंबई महापालिकेचे ईटीसी केंद्र पंतप्रधान पुरस्काराप्रमाणेच इतरही अनेक राष्ट्रीय व राज्य पुरस्काराने नावाजले जात आहे. एकाच छताखाली सर्व प्रकारच्या दिव्यांगांना सामावून घेणारे हे केंद्र देशात एकमेव आहे. त्यामुळे विविध राज्यांतील शासकीय व निमशासकीय तसेच खासगी संस्थांकडून हा पथदर्शी उपक्रम म्हणून अनुकरण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. अशातच ओरिसा सरकारने या उपक्रमासाठी पुढाकार घेतला आहे. नवी मुंबई महापालिकेच्या ईटीसी केंद्राप्रमाणेच ओरिसा राज्यात केंद्र साकारण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. याकरिता ओरिसा राज्यातील सामाजिक सुरक्षा आणि दिव्यांग व्यक्ती सक्षमीकरण विभाग व युनिसेफ यांच्या संयुक्त पथकाने नवी मुंबईला भेट दिली आहे. त्यांच्या या दोन दिवसीय अभ्यासदौऱ्या दरम्यान ईटीसीच्या संचालिका वर्षा भगत यांनी त्यांना केंद्राच्या संपूर्ण कामकाजाची माहिती दिली. या पथकामध्ये सामाजिक सुरक्षा आणि दिव्यांग व्यक्ती सक्षमीकरण विभागाचे प्रधान सचिव नितेनचंद्रा, संचालक मानसी निम्बल, सह संचालक आर. के. शर्मा व युनिसेफच्या मधुमिता दास आदी उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थी, पालक तसेच तज्ज्ञांसोबतही संवाद साधला.