शिक्षकांवर लादले जातेय इतर कामांचे ओझे; जिल्हा परिषद शाळांची स्थिती

By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2021 01:20 AM2021-01-30T01:20:39+5:302021-01-30T01:20:55+5:30

पनवेल तालुक्यातील ९५० शिक्षकांचा प्रश्न 

Other workloads are imposed on teachers; Status of Zilla Parishad schools | शिक्षकांवर लादले जातेय इतर कामांचे ओझे; जिल्हा परिषद शाळांची स्थिती

शिक्षकांवर लादले जातेय इतर कामांचे ओझे; जिल्हा परिषद शाळांची स्थिती

Next

अरुणकुमार मेहत्रे

कळंबोली : जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षकांना आपत्ती व्यवस्थापन, निवडणूक तसेच जनगणनेची कामे करावीच लागतात. परंतु, याव्यतिरिक्तही कामे करावी लागत असल्याने मुलांच्या शिक्षणावर परिणाम होत आहे. शाळा सुरू झाल्याने. शिकवण्याबरोबरच इतर कामे करावी लागत आहेत. 

पनवेल तालुक्यात जिल्हा परिषदेच्या २४८ शाळा आहेत. तर ९५० शिक्षक कार्यरत आहेत. या शिक्षकांना निवडणूक, जनगणना, आपत्ती व्यवस्थापन, शालेय विद्यार्थ्यांची माहिती ऑनलाईन भरणे, शिष्यवृत्तीची माहिती संकलित करणे, शालेय पोषण आहाराचे वाटप, केंद्रीय तसेच तालुकास्तरावरील मिटींग, मतदान ओळखपत्र वाटप करणे, मतदान याद्यांतील नावे समाविष्ट करण्यासह वगळणे, आदी जबाबदाऱ्या शिक्षकांवर आहेत.

बहुतांश शाळा खेड्यात आहेत तर काही शाळा एकशिक्षकी आहेत. या शाळेत विद्यार्थ्यांना शिकवावे की कामे करावीत, हा प्रश्न उपस्थित होतो. कोरोनाकाळात शाळा बंद होत्या. मात्र, ऑनलाईन शिक्षणाच्या माध्यमातून शिक्षक कार्यरत होते. तर काही शिक्षकांना कोरोना उपाययोजनांसाठी सर्वेक्षण, नाकाबंदी, रेशनिंग दुकान अशा ठिकाणी ड्युटी लावण्यात आली होती. 

शासकीय योजनांचे करावे लागते आहे मोठे काम 
जनगणना,निवडणूक, आपत्ती व्यवस्थापनाव्यतिरिक्त मतदार याद्या अद्ययावत करणे त्याकरिता लोकांना माहिती देणे, गावातील लोक शौचालयाचा वापर करतात की नाही याची माहिती घेणे, महसूल यंत्रणेसोबत निवडणुकीसाठी बुथ लेव्हल ऑफिसर म्हणून काम करणे, दररोज शाळेत पोषण आहार शिजविण्यावर लक्ष देणे, प्रत्येक विद्यार्थ्यांची माहिती एमडीएम पोर्टलवर भरणे आदी कामाचा ताण असतोच.

एकशिक्षकी शाळांचे हाल
पनवेल तालुक्यात कमी पट असल्याने २६ शाळा एकशिक्षकी आहेत. तर काही ठिकाणी द्विशिक्षकी शाळा आहेत. शासकीय योजनांची कामे करताना मोठ्या शाळांच्या तुलनेत या शाळेमधील शिक्षकांची चांगलीच दमछाक होते. एकशिक्षकी शाळेत अध्यापन तसेच अशैक्षणिक कामे एकाच शिक्षकांच्या खांद्यावर पडत आहेत. त्यामुळे अध्यापनाच्या कामाला शिक्षक पाहिजे त्या प्रमाणात न्याय देऊ शकत नसल्याचे चित्र आहे.

शाळा सुरू असताना या कामाचा त्रास होतो. एकशिक्षकी शाळांतील िशक्षकांना तर मोठ्या प्रमाणात त्रास सहन कराव लागतो. दरवेळी शिक्षकांना भरपूर अशैक्षणिक कामे करावी लागतात. शासकीय कामे ठीक आहे, पण इतर कामामुळे अनेक शिक्षक त्रस्त असतात. कोरोनाकाळात शाळा बंद होत्या त्यावेळी प्रशासनाने जी कामे शिक्षकांवर सोपविली ती शिक्षकांनी चांगल्या पध्दतीने पार पाडली आहेत.
 - वसंत मोकल, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघटना, पनवेल

शालेय कामाव्यतिरिक्त शिक्षकांना गुंतवले जात नाही. बहुतांश कामे ही शालेयअंतर्गत आहेत. ती करावीच लागतात. बैठकांचे प्रमाणही कमी केले आहे. ऑनलाईन बैठकीवर भर देण्यात येत आहे. माहिती व्हाट्सॲप किंवा ऑनलाईनच्या माध्यमातून मागविली जात आहे.
- नवनाथ साबळे , गटशिक्षणाधिकारी, पनवेल

Web Title: Other workloads are imposed on teachers; Status of Zilla Parishad schools

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Teacherशिक्षक