अपंगांच्या डब्यामध्ये इतरांना परवानगी नको

By admin | Published: January 9, 2016 02:18 AM2016-01-09T02:18:58+5:302016-01-09T02:18:58+5:30

अपंग नागरिकांसाठी राखीव असलेल्या डब्यामध्ये ज्येष्ठ नागरिकांना प्रवेश देण्याचा विचार पश्चिम रेल्वे प्रशासन करत आहे.

Others do not have permission for handicapped coaches | अपंगांच्या डब्यामध्ये इतरांना परवानगी नको

अपंगांच्या डब्यामध्ये इतरांना परवानगी नको

Next

नवी मुंबई : अपंग नागरिकांसाठी राखीव असलेल्या डब्यामध्ये ज्येष्ठ नागरिकांना प्रवेश देण्याचा विचार पश्चिम रेल्वे प्रशासन करत आहे. परंतु अपंग उत्कर्ष सेवा संस्थेने रेल्वे मंत्र्यांना पत्र पाठवून विरोध केला आहे. ज्येष्ठ नागरिकांविषयी सर्वांनाच आपुलकी असून त्यांच्यासाठी स्वतंत्र डबा देण्याची मागणी केली आहे.
मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पनवेल परिसरातील अनेक अपंग नागरिक अपंगत्वावर मात करून नोकरी, व्यवसायामध्ये यशस्वीपणे काम करत आहेत. रेल्वेने प्रवास करताना शारीरिकदृष्ट्या सक्षम असणाऱ्या नागरिकांचीही भंबेरी उडत असते. परंतु सर्व अडचणींवर मात करून अपंग नागरिक गर्दीच्या वेळीही रेल्वेने प्रवास करत आहेत. हार्बर मार्गावर चार जण बसू शकतील व ८ ते १० जण उभे राहतील एवढीच जागा असते. अपंगांची संख्या वाढल्यामुळे हा डबा अपुरा पडू लागला आहे. मध्य व पश्चिम उपनगरीय मार्गावर एक डबा अपंगांसाठी असून त्यामध्ये जास्तीत जास्त १९ जण बसू शकतात. याच डब्यामध्ये कॅन्सर रूग्ण व गरोदर महिलांना प्रवास करण्याची परवानगी यापूर्वीच दिली आहे. आता रेल्वे प्रशासन ज्येष्ठ नागरिकांना या डब्यात प्रवेश देण्याविषयी विचार करत आहेत. यामुळे अपंग नागरिकांनी नाराजी व्यक्त करण्यास सुरवात केली आहे.
अपंग उत्कर्ष सेवा संस्थेचे सचिव सोमनाथ चौघुले यांनी रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांना पत्र पाठवून अपंगांची भूमिका स्पष्ट केली आहे. ज्येष्ठ नागरिकांविषयी सर्वांनाच आदर आहे. एकूण लोकसंख्येमध्ये ११ टक्के ज्येष्ठ नागरिक आहेत. मुंबईत जनरल डब्यातून प्रवास करणे ज्येष्ठांना शक्य होत नाही. त्यांच्यासाठी स्वतंत्र सुविधा असलीच पाहिजे. परंतु अगोदरच अपंगांच्या डब्यामध्ये अपुरी जागा आहे. त्यामध्ये गरोदर महिला व कॅन्सर रूग्णांनाही प्रवेश दिला आहे. ज्येष्ठ नागरिकांनीही या डब्यात प्रवेश केला तर अपंगांची व ज्येष्ठ नागरिक दोघांचीही गैरसोय होणार आहे. यामुळे रेल्वे प्रशासनाने सर्वांनाच अडचणीत ठरेल असा निर्णय घेवू नये असे मत व्यक्त केले आहे. रेल्वे मंत्री या पत्राची दखल घेणार का याकडे सर्व अपंग व ज्येष्ठ नागरिकांचेही लक्ष लागले आहे.

Web Title: Others do not have permission for handicapped coaches

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.