नवी मुंबई : मराठा समाजाने राज्यातील विविध समाजांचे नेतृत्व केले आहे. आज छत्रपती शिवाजी महाराजांचे अठरापगडजातीचे मावळे एकमेकांसमोर उभे राहणे महाराष्ट्राला भूषणावह नाही. दोन समाजांमध्ये दुफळी निर्माण होणार नाही, यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. मराठा समाजाला कायद्याच्या चौकटीत बसवून टिकणारे आरक्षण देणे ही आमची कमिटमेंट असल्याचे आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी नवी मुंबईत दिले.
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये माथाडी संघटनेचे संस्थापक अण्णासाहेब पाटील यांच्या जयंतीनिमित्त आयोजित मेळाव्यात ते बोलत होते. या मेळाव्याला आमदार गणेश नाईक, प्रवीण दरेकर, मंदा म्हात्रे, प्रसाद लाड, संदीप नाईक, संजीव नाईक उपस्थित होते. फडणवीस म्हणाले की, मराठा समाजाची चळवळ उभी करून अण्णासाहेब पाटील यांची आर्थिक निकषावर आरक्षण देण्याची त्यांची मागणी तेव्हा दुर्दैवाने मंजूर होऊ शकली नाही. कायद्याच्या चौकटीत बसेल, अशी मागणी असली पाहिजे. अन्यथा एखादा निर्णय न्यायालयात टिकला नाही तर समाजाची फरपट होईल, असेही फडणवीस म्हणाले.
‘त्या’ कामगारांवर कारवाई करा
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या फळ मार्केटमध्ये बांगलादेशी कामगार काम करत आहेत. कमी मजुरीत कामगार मिळतो म्हणून व्यापाऱ्यांनी त्यांना आश्रय देऊ नये. बांगलादेशी कामगारांवर कारवाई करावी, अशी मागणी माथाडी नेते नरेंद्र पाटील यांनी केली.
बाजार समितीमधील आवक कमी झाली आहे. बाजार समितीच्या फळ मार्केटमध्ये बांगलादेशी कामगार काम करत आहेत. त्यांना मार्केटमध्ये आश्रय मिळत आहे. बांगलादेशमध्ये हिंदूंवर अन्याय होत आहे. येथे राहणाऱ्यांना काम दिले जात आहे.
कमी पैशांत कामगार उपलब्ध होतात म्हणून त्यांना आश्रय देऊ नये. त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी पाटील यांनी उपमुख्यमंत्र्यांकडे केली.
फडणवीस यांच्या भाषणातील मुद्दे :
अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या माध्यमातून एक लाख उद्योजक घडवले, ८४०० कोटींचे कर्जवाटप.
मराठा समाजासातील हाॅस्टेल न मिळणाऱ्यांना ७ हजार निर्वाह भत्ता.