‘आपले सरकार’मुळे प्रशासन दक्ष !
By Admin | Published: January 19, 2016 02:13 AM2016-01-19T02:13:37+5:302016-01-19T02:13:37+5:30
नागरिकांच्या पैशाची आणि वेळेची बचत व्हावी, यासाठी २६ जानेवारीपासून ‘आपले सरकार’ हे पोटर्ल सर्वसामांन्यासाठी सुरू होणार आहे.
अलिबाग : नागरिकांच्या पैशाची आणि वेळेची बचत व्हावी, यासाठी २६ जानेवारीपासून ‘आपले सरकार’ हे पोटर्ल सर्वसामांन्यासाठी सुरू होणार आहे. सेवा हमी कायदा, तक्रार निवारण, माहितीचा अधिकार आणि सहयोग या सेवांचा या पोर्टलमध्ये समावेश आहे. संगणकाच्या बरोबरीनेच मोबाइलवरही सेवा मिळणार आहे. या सेवेमुळे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना आता दक्ष राहून काम करावे लागणार आहे.
राज्य सरकार ई-गव्हर्नर अंगीकारले आहे. त्यामुळे पेपरलेस कामे करण्यावर भर देण्यात येत असून, पैशाची आणि वेळेचीही बचत होणार आहे. ‘आपले सरकार’ या पोर्टलमुळे सरकार आणि नागरिक हे एकमेकांच्या जवळ येणार आहेत. या माध्यमातून नागरिकांना आॅनलाइन अर्ज करता येणार आहेत. अर्जदाराच्या अर्जाचा प्रवास कसा आणि सध्या कोणत्या टेबलावर आहे, याची माहितीही या पोर्टलमुळे प्राप्त होणार आहे. अर्जाचा मागोवा घेत असताना याद्वारे जलद सेवा मिळणार आहे.
वय, राष्ट्रीयत्व आणि अधिवास प्रमाणपत्र, मिळकितीचे प्रमाणपत्र, तात्पुरता रहिवास प्रमाणपत्र, ज्येष्ठ नागरिक प्रमाणपत्र, पत दाखला अशा महसूल विभागाशी संलग्न असलेल्या सेवा, त्याचप्रमाणे ग्रामविकास व पंचायराज, कामगार विभाग, जलसंपदा विभाग, वन विभाग, नोंदणी व मुद्रांक विभाग यांच्या संलग्न असणाऱ्या सेवा संगणकाच्या एका क्लिकवर प्राप्त होणार आहेत. कोणत्या अधिकाऱ्याने अर्जदाराच्या फाइलचा निपटारा किती दिवसांत करणे अपेक्षित आहे, याची माहितीही या पोर्टलवर टाकण्यात आली आहे. त्यामुळे जरी आॅनलाइन माहिती उपलब्ध झाली नाही, तरी अर्जदार संबंधित अधिकाऱ्याला याचा जाब विचारू शकतो. त्यामुळे विहित वेळेमध्ये कामाचा निपटारा करण्यास संबंधित अधिकारी बांधील आहे. (प्रतिनिधी)