शहरात १०९७ शाळाबाह्य मुले
By admin | Published: July 7, 2015 02:16 AM2015-07-07T02:16:19+5:302015-07-07T02:16:19+5:30
महापालिकेने शहरात केलेल्या सर्वेक्षणामध्ये १०९७ शाळाबाह्ण मुले आढळून आली आहेत. घणसोली परिसरात सर्वाधिक १८२ विद्यार्थी आढळून आले आहेत.
नवी मुंबई : महापालिकेने शहरात केलेल्या सर्वेक्षणामध्ये १०९७ शाळाबाह्ण मुले आढळून आली आहेत. घणसोली परिसरात सर्वाधिक १८२ विद्यार्थी आढळून आले आहेत. ८८ विशेष मुलेही सर्वेक्षणात आढळली आहेत. या सर्वांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहामध्ये आणण्यासाठी महापालिकेच्या वतीने प्रयत्न सुरू आहेत.
बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार २००९ नुसार ६ ते १४ वयोगटातील कोणतेही मुल शिक्षणापासून वंचित राहू नये याकरीता महाराष्ट्र शासनाने सर्वेक्षण करण्याचे निर्देश दिले होते. याप्रमाणे महापालिका आयुक्त दिनेश वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली ४ जुलैला सकाळी ७ ते सायंकाळी ७ वाजेच्या दरम्यान शहरात सर्वेक्षण करण्यात आले. यासाठी ४४५० प्रगणकांची नियुक्ती करण्यात आली होती. प्रगणकांवर लक्ष देण्यासाठी १०४ पर्यवेक्षक, ११ क्षेत्रीय अधिकारी व ५ भरारी पथकांची नियुक्ती केली होती.
या सर्वेक्षणामध्ये नागरिकांनी सहभाग घ्यावा यासाठी जनजागृती करण्यात आली होती. २ जुलै रोजी शहरात रॅली काढण्यात आली होती. शनिवारी करण्यात आलेल्या सर्वेक्षणामध्ये ६ ते १० वर्षे वयोगटातील ३०६ मुले व ३३१ मुली आढळून आल्या आहेत. शाळा मध्येच सोडलेली २७६ मुले व १८४ मुली आढळून आल्या आहेत. एकूण १०९७ शाळाबाह्ण मुले आढळून आली आहेत. यामध्ये ८८ विशेष मुलांचा समावेश आहे.
महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार या शाळाबाह्ण बालकांना शिक्षणाच्या प्रवाहात सामावून घेतले जाणार आहे. लवकरच महापालिका शाळांच्या केंद्रप्रमुखांची बैठक आयोजित केली जाणार आहे. शाळाबाह्ण मुले ज्या परिसरात आढळून आली त्याच परिसरात जवळच्या शाळेत त्यांना प्रवेश दिला जाणार आहे. विशेष मुलांना घरोघरी जावून शिकविण्याचे काम यापूर्वीच सुरू केले आहे. या मुलांना दर्जेदार शिक्षण देण्यासाठी विशेष प्रयत्न केले जाणार आहेत. सर्वेक्षण आयुक्त दिनेश वाघमारे यांच्यासह महापौर सुधाकर सोनावणे यांच्या मार्गदर्शनाखाली व उपआयुक्त अमरिष पटनिगिरे यांच्या नियंत्रणात पार पाडण्यात आली.