पनवेल : सर्व शिक्षा अभियानांतर्गत ४ जुलैला राज्यभर एकदिवसीय शाळाबाह्य बालकांचे सर्वेक्षण मोहीम राबविण्यात आली होती. परंतु, या सर्वेक्षणातून अनेक शाळाबाह्य बालकांची नोंद झाली नसल्याचे काही सामाजिक संघटनांचे म्हणणे होते. यासंदर्भात सामाजिक संघटनांनी शासनाकडे वारंवार पाठपुरावा केला. त्यामुळे नव्याने शाळाबाह्य बालकांचा शोध घेण्यासाठी सामाजिक संघटनांचे सहकार्य घेण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. शिक्षण आरटीई अॅक्ट २००९ नुसार ६ ते १४ वर्षे वयोगटातील प्रत्येक बालकाला सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार प्राप्त झाला आहे. कायद्यानुसार या वयोगटातील प्रत्येक बालक शिक्षणाच्या प्रवाहात यावा, या अनुषंगाने दरवर्षी शाळाबाह्य विद्यार्थ्यांचे सर्वेक्षण करून त्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणल्या जाते. परंतु, दरवर्षी या सर्वेक्षणामध्ये अनेक शाळाबाह्य बालकांना शिक्षणापासून वंचित राहावे लागत असल्याचे वास्तव देखील आहे. त्यामुळे यंदा ४ जुलैला राज्यस्तरावर शाळाबाह्य बालकांच्या शोधासाठी एकदिवसाची विशेष मोहीम राबविण्यात आली होती. या मोहिमेअंतर्गत शिक्षकांसोबतच इतर शासकीय कर्मचाऱ्यांनी शाळाबाह्य विद्यार्थ्यांचा घरोघरी जाऊन शोध घेतला. शोध मोहिमेनंतर समोर आलेल्या शाळाबाह्य बालकांच्या आकडेवारीवर काही सामाजिक संघटनांनी आक्षेप नोंदविला. ही आकडेवारी खरी नसून, अद्यापही बऱ्याच शाळाबाह्य बालकांची नोंद शिल्लक असल्याचे सांगत यासाठी विशेष मोहीम राबविण्याची मागणी सामाजिक संघटनांनी शिक्षणमंत्र्यांकडे केली होती. या संदर्भात शासनाक डे वारंवार पुरावा केल्यानंतर शाळाबाह्य बालकांचा नव्याने शोध घेण्याचे ठरविले आहे. त्यासाठी राज्यातील सामाजिक संघटनांची मदत घेण्यात येणार असून, ही प्रक्रिया निरंतर चालणार आहे. या अनुषंगाने राज्यात जिल्हास्तरावर शिक्षणाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात येत आहे. (वार्ताहर)जिल्हा, तालुका स्तरावर समिती गठीत सामाजिक संघटनांच्या सहाय्याने जिल्हा स्तरावर समिती गठीत करण्यात येत आहे. शिक्षणाधिकारी माध्यमिक यांच्या मार्गदर्शनाखाली ही समिती कार्य करणार आहे. तालुका पातळीवर गटशिक्षणाधिकारी यांच्या मार्गदर्शनात सामाजिक संघटना कार्य करणार आहेत. या मोहिमेत सहभागी झालेल्या सामाजिक संघटनांना कार्यक्षेत्र वाटून देण्यात येत आहे. दिलेल्या परिसरात या संस्था शाळाबाह्य बालकांचा शोध घेऊन त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणणार आहेत.
सामाजिक संघटनांमार्फत शाळाबाह्य मुलांचा शोध
By admin | Published: November 25, 2015 2:09 AM