रेल्वे स्टेशनच्या बाहेर २१ हजार घरांचा प्रकल्प; सिडकोचा निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 6, 2019 12:58 AM2019-08-06T00:58:22+5:302019-08-06T00:58:30+5:30

प्रकल्प व्यवस्थापनासाठी निविदा मागविल्या; पाच ठिकाणी प्रस्ताव

Out of the train station a project of 3,000 houses | रेल्वे स्टेशनच्या बाहेर २१ हजार घरांचा प्रकल्प; सिडकोचा निर्णय

रेल्वे स्टेशनच्या बाहेर २१ हजार घरांचा प्रकल्प; सिडकोचा निर्णय

Next

नवी मुंबई : हार्बर मार्गावरील रेल्वे स्थानकाच्या बाहेरील उपलब्ध जागेवर अल्प उत्पन्न गटातील नागरिकांसाठी घरे बांधण्याचा निर्णय सिडकोने घेतला आहे. सानपाडासह पाच ठिकाणी हा प्रकल्प उभारण्यात येणार असून, २१ हजार ८२१ घरांची निर्मिती केली जाणार आहे. बांधकामासाठी प्रकल्प व्यवस्थापन संमंत्रकांची नेमणूक करण्यासाठी निविदा मागविण्यात आली आहे.

उरण रेल्वेच्या पहिल्या टप्याचे नोव्हेंबर, २०१८ मध्ये उद्घाटन करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सिडको कार्यक्षेत्रामध्ये १ लाख घरांचे बांधकाम केले जाणार असल्याचे स्पष्ट केले होते. यानंतर, सिडकोने जास्तीत जास्त घरांची निर्मिती करण्यासाठीची कार्यवाही सुरू केली आहे. ट्रक टर्मिनल व रेल्वे स्थानक परिसरात घरांचे बांधकाम करण्याची घोषणा केली होती. याचाच भाग म्हणून सानपाडा रेल्वे स्टेशनच्या महामार्ग व निवासी विभागाकडील बाजूला, जुईनगर, मानसरोवर, खांदेश्वर रेल्वे स्टेशन व तळोजा सेक्टर १ मध्ये वाणिज्यिक क्षेत्राचा विकास करून त्या जागांवर अल्प उत्पन्न गटामधील नागरिकांसाठी २१ हजार ८२१ घरांची निर्मिती करण्याचा निर्णय यापूर्वी घेतला आहे. कामांसाठी प्रकल्प व्यवस्थापक संमंत्रकांची नेमला जाणार आहे. निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर प्रत्यक्ष घरांचे बांधकाम करण्यासाठीची पुढील प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे.

सर्वसामान्यांसाठी जास्तीत जास्त घरांची निर्मिती करण्यासाठी सिडकोचा प्रयत्न सुरू असून, त्याचे नागरिकांकडूनही स्वागत होत आहे. परंतु घरांची उभारणी करण्यासाठी रेल्वे स्थानक, ट्रक टर्मिनल परिसरातील मोकळ्या जागांचा उपयोग केला जाणार आहे. यामुळे भविष्यात परिसरामध्ये गंभीर समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे. पार्किंगचा प्रश्न ऐरणीवर येऊ शकतो. रेल्वे स्टेशन परिसरातील वाहतूककोंडीमध्येही वाढ होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. यामुळे या प्रकल्पांना सामाजिक कार्यकर्त्यांकडून विरोध होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

सीवूडमध्ये परिस्थिती गंभीर
सिडकोने सीवूड रेल्वे स्थानकाच्या जागेवर भव्य वाणिज्य संकुल उभारले आहे. यामुळे या परिसरात पार्किंगचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. रेल्वे स्टेशनच्या समोर वारंवार वाहतूक कोंडी होऊ लागली आहे. वाहने उभी करण्यासाठी जागा अपुरी पडू लागली आहे. हॉर्नच्या अतिवापरामुळे परिसरातील शांततेचा भंग होऊ लागला आहे. नागरिकांची प्रचंड गैरसोय होत आहे. सिडकोने इतर रेल्वे स्टेशन परिसरामध्येही गृहनिर्माण प्रकल्प उभारले, तर त्यामुळे भविष्यात मुंबई व ठाणे प्रमाणे नवी मुंबईमधील रेल्वे स्थानकालाही समस्यांचा विळखा पडण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

Web Title: Out of the train station a project of 3,000 houses

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :cidcoसिडको