वर्षभरापासून रस्त्याचे काम अपूर्ण असल्याने पनवेलकरांचा उद्रेक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 7, 2019 01:44 AM2019-10-07T01:44:19+5:302019-10-07T01:44:30+5:30

आॅक्टोबर २०१८ मध्ये या रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली. वर्षभराचा काळ लोटता आला तरीदेखील रस्त्याचे काम पूर्ण होत नाही.

Outbreak of Panvelkar since road work is incomplete from year to year | वर्षभरापासून रस्त्याचे काम अपूर्ण असल्याने पनवेलकरांचा उद्रेक

वर्षभरापासून रस्त्याचे काम अपूर्ण असल्याने पनवेलकरांचा उद्रेक

Next

- वैभव गायकर

पनवेल : महापालिकेच्या नगरसेविका मुग्धा लोंढे यांच्या अपघाती मृत्यूने पनवेल शहर हादरले. या घटनेला वाहनचालकाबरोबरच परिसरातील रस्त्यांची कामे करणारा ठेकेदारही जबाबदार आहे. वर्षभरापासून या रस्त्याचे काम सुरू असून या ठिकाणी अनेक अपघात घडले आहेत. नगरसेविकेचा बळी रस्त्यानेच घेतल्याने या घटनेचे पडसाद शहरात उमटत आहेत. रस्त्याचे काम महापालिकेने दिवाळीपूर्वी न केल्यास परिसरातील रहिवाशांनी मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे.
आॅक्टोबर २०१८ मध्ये या रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली. वर्षभराचा काळ लोटता आला तरीदेखील रस्त्याचे काम पूर्ण होत नाही. यासंदर्भात कफचे अरुण भिसे यांनी पालिका प्रशासनाला आमरण उपोषणाचा इशारा दिला होता. रस्त्याचे काम बिटकॉन या कंपनीला देण्यात आले आहे. रस्त्यालगत गटारांची कामेही अपूर्ण असल्याने डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. परिसरात असलेल्या मुनोत रेसिडेन्सी, श्रीजी सोसायटी, श्रेयश सोसायटी आदी सोसायटींमधील रहिवाशांना या ठिकाणाहून नियमित ये-जा करावी लागते. संपूर्ण पावसाळा लोटला तरीदेखील कामामध्ये काहीच सुधारणा होत नाही. तांत्रिक अडचणीमुळे हे काम थांबले असल्याचे बोलले जात असून या ठिकाणी सुरक्षेसंदर्भात बिटकॉन कंत्राटदाराने कोणतीच खबरदारी घेतली नाही, यामुळेच आजवर अनेक नागरिक या ठिकाणी अपघातग्रस्त झाले आहेत. त्यातच पनवेल महापालिकेच्या नगरसेविकेलाही जीव गमवावा लागला आहे. वर्षभरापासून रखडलेले काम त्वरित पूर्ण करा, अन्यथा येऊ घातलेल्या विधानसभा मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा परिसरातील रहिवाशांनी दिला आहे.

ठेकेदाराला काळ्या यादीत टाका
रस्त्याचे काम करणाऱ्या ठेकेदाराने वर्षभरापासून अक्षरश: पसारा घातला आहे. कोणतीही सुरक्षा यंत्रणा या ठिकाणी राबविली नसताना ये-जा करणाºया रहिवाशांचा जीव टांगणीला आहे. त्यामुळे कंत्राटदाराला पालिकेने त्वरित काळ्या यादीत टाकावे, तसेच संबंधित ठेकेदाराला पाठीशी घालणाºया अधिकाऱ्यांवरही कारवाई करण्याची मागणी कफ संस्थेचे अरुण भिसे यांनी व्यक्त केला आहे.

वर्षभरापासून रस्त्याच्या अपूर्ण कामामुळे विविध समस्यांना तोंड देत आहोत. प्रशासन व कंत्राटदारांच्या गलथान कारभाराचा फटका एका नागरसेविकेला जीव गमावून द्यावा लागत असेल तर सर्वसामान्यांचे काय? संबंधित काम दिवाळीपूर्वी पूर्ण न झाल्यास २१ रोजीच्या विधानसभा मतदानावर आमचा बहिष्कार असेल.
- भूपेश जावळे, रहिवासी, पनवेल

कंत्राटदाराला संबंधित जागेवर सुरक्षा यंत्रणा राबविण्याचे आदेश दिले आहेत. कामाला त्वरित सुरुवात करण्यात आली आहे. लवकरात लवकर काम पूर्ण केले जाईल.
- डॉ. प्रशांत रसाळ, अतिरिक्त आयुक्त,
पनवेल महापालिका

Web Title: Outbreak of Panvelkar since road work is incomplete from year to year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :panvelपनवेल