नामदेव मोरेलोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : ऑक्टोबरपासून नवी मुंबईमध्ये कोरोना रुग्णांची संख्या कमी होऊ लागली होती. परंतु १ फेब्रुवारीला लोकलसेवा सर्वांसाठी खुली झाली. त्यानंतर कोरोना रुग्णांचा आलेख पुन्हा वाढू लागला आहे. प्रत्येक नोडमध्ये प्रादुर्भाव वाढत असून कोरोनामुक्त झालेल्या इंदिरानगर, चिंचपाडा परिसरामध्येही पुन्हा रुग्ण सापडू लागले आहेत. निष्काळजीपणा करणारांचा फटका सर्व शहरवासीयांना सहन करावा लागत असून नियमांचे काटेकोरपणे पालन न केल्यास परिस्थिती अजून हाताबाहेर जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे. नवी मुंबई कोरोनामुक्त करण्यासाठी महानगरपालिका प्रशासनाने ‘ब्रेक द चेन’ व ‘शून्य मृत्यू मोहीम’ सुरू केली होती. जूनमध्ये सुरू झालेल्या अभियानाला सकारात्मक प्रतिसाद मिळाला व रुग्णसंख्या कमी होण्यास सुरुवात झाली. सप्टेंबरमध्ये एका महिन्यात १०,३९८ जणांना कोरोनाची लागण झाली होती. ऑक्टोबरमध्ये हे प्रमाण ८,११५ वर आले. नोव्हेंबरमध्ये ३,८०५ व डिसेंबरमध्ये २,७५८ तसेच जानेवारीमध्ये सर्वांत कमी २,०२७ रुग्ण वाढले. फेब्रुवारीच्या २८ दिवसांमध्ये तब्बल २,३०२ रुग्ण वाढले आहेत. मार्चच्या पहिल्या दिवसापासून प्रतिदिन १०० पेक्षा जास्त रुग्ण वाढत आहेत. पहिल्या तीन दिवसांत रुग्ण संख्या ५५४ झाली आहे. रुग्णवाढीचा वेग चिंताजनक असून, महानगरपालिका प्रशासन सतर्क झाले आहे. शहरातील महापालिकेचे एकच कोरोना केअर सेंटर सद्य:स्थितीमध्ये सुरू आहे. प्रशासनाने तुर्भेमधील राधास्वामी सत्संग भवनमधील केंद्र सुरू करण्याच्या हालचालीही सुरू केल्या आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठीच्या उपाययोजनांमध्ये वाढ करण्यात आली आहे. कोरोना चाचण्यांच्या संख्येमध्येही वाढ करण्यात आली आहे. गत आठवड्यात सरासरी २,४१५ जणांची चाचणी होत होती. बुधवारी ३,०३८ जणांची चाचणी करण्यात आली. आतापर्यंत शहरातील ८ लाख ८४ हजार १०९ जणांची चाचणी करण्यात आली असून, त्यापैकी ५ लाख ८१ हजार ६७५ जणांची आरटीपीसीआर व ३ लाख २ हजार ४३४ जणांची ॲन्टिजेन चाचणी करण्यात आली आहे. आतापर्यंत ६ लाख ७४ हजार ७२० जणांनी क्वारंटाईनचा कालावधी पूर्ण केला आहे. सद्य:स्थितीमध्ये २९ हजार ७८४ जणांचे क्वारंटाईन सुरू आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागरिकांनीही नियमित मास्कचा वापर करावा. वारंवार हात धुणे व सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे, असे आवाहन केले आहे.
इंदिरानगरसह चिंचपाडामध्ये पुन्हा सापडले रुग्णnमहानगरपालिका कार्यक्षेत्रातील इंदिरानगर व चिंचपाडा नागरी आरोग्य केंद्राचा परिसर ‘कोरोनामुक्त’ झाला होता. nइंदिरानगरमध्ये जवळपास १ महिना एकही रुग्ण सापडला नव्हता. परंतु सद्य:स्थितीमध्ये या परिसरातही पुन्हा प्रादुर्भाव सुरू झाला असून तेथे पाच सक्रिय रुग्ण आहेत. nचिंचपाडामध्ये रुग्ण संख्या सातवर गेली आहे. इलठाणपाडा व कातकरीपाडासह सर्व नागरी आरोग्य केंद्रांच्या परिसरात रुग्ण वाढत आहेत.