नवी मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल मंगळवारी जाहीर झाला आहे. या निकालामध्ये पुन्हा एकदा मुलींनी बाजी मारली आहे. शहरात बारावीचा ८९.१३ टक्के निकाल लागला आहे. तर सुमारे ३ महाविद्यालयांच्या सर्वच शाखांचा निकाल १00 टक्के लागला आहे. निकालानंतर विद्यार्थ्यांनी महाविद्यालयात जल्लोष साजरा केला. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे उच्च माध्यमिक प्रमाणपत्र प्रात्यक्षिक परीक्षा १ फेब्रुवारी ते १८ फेब्रुवारी २0१९ व २१ फेब्रुवारी ते २0 मार्च या कालावधीमध्ये लेखी परीक्षा घेण्यात आली होती.परीक्षेसाठी नवी मुंबई शहरातील तिन्ही शाखेच्या ६0 हून अधिक महाविद्यालयांमधून १४,८७९ नियमित विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. यामधून १४,८७३ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. ६९४ पुनर्परीक्षार्थी या परीक्षेला बसले होते. यामधून १२,८६२ नियमित परीक्षार्थी पास झाले असून १८८ पुनर्परीक्षार्थी पास झाले आहेत.नवी मुंबई शहरातील फादर अँगल महाविद्यालय वाशी, नेरु ळमधील सेंट झेवियर्स हायस्कूल आणि महाविद्यालय, सीवूडमधील सिक्रेट हार्ट स्कूल आणि महाविद्यालय या महाविद्यालयांमधील सर्वच शाखांचा निकाल १00 टक्के लागला आहे. कोपरखैरणेमधील रा.फ. महाविद्यालयाच्या सायन्स शाखेचा, कोपरखैरणे येथील ख्रिस्ट अॅकॅडमी, सेंट मेरी महाविद्यालय, सीबीडी येथील भारती विद्यापीठ महाविद्यालयाच्या कॉमर्स शाखेचा निकाल १00 टक्के लागला आहे. तसेच नेरुळमधील एमजीएम ओकेशनल महाविद्यालयाचा निकाल देखील १00 टक्के लागला आहे.निकालाचा दिवस असल्याने विद्यार्थी आणि पालकांना सकाळपासूनच उत्सुकता लागली होती. दुपारी आॅनलाइन निकाल जाहीर झाल्यावर विद्यार्थ्यांनी पालकांसह शाळा गाठून शिक्षकांसमवेत जल्लोष साजरा केला.अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनी खचून न जाता नव्या उमेदीने पुन्हा अभ्यास करावा, आयुष्यात खूप मोठ्या संधी आहेत.गुण पडताळणीसाठी अर्ज करण्याची तारीख ७ जूनपर्यंत असून उत्तरपत्रिकांच्या छायाप्रतीसाठी विद्यार्थ्यांनी १७ जूनपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन विभागीय अध्यक्ष कृष्णकुमार पाटील यांनी केले आहे.>पनवेलमध्ये टक्का वाढलाआॅनलाइन निकाल जाहीर झाल्यानंतर पनवेल शहरातील सायबर कॅफे त्याचबरोबर महाविद्यालयाच्या आवारात मोबाइलवर निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांनी गर्दीकेली होती.पनवेल तालुक्यातील व्ही. के. हायस्कूल विज्ञान शाखेचा ९२.५४ टक्के, कला शाखेचा ७५.५४ टक्के तर वाणिज्य शाखेचा ९१.८४ टक्के निकाल लागला आहे. त्याचबरोबर चांगू काना ठाकूर विज्ञान शाखेचा ९७.६५ टक्के, कला शाखा ९६.६१ टक्के, वाणिज्य शाखेचा ९६.३९ टक्के निकाल लागला आहे. बांठिया माध्यमिक विद्यालय विज्ञान शाखेचा १०० टक्के निकाल लागला असून कला शाखा ८६.५९ टक्के, वाणिज्य शाखेचा ९५ टक्के निकाल लागला आहे. सुषमा पाटील महाविद्यालय कामोठे विज्ञान शाखेचा १०० टक्के तर कला शाखा ६० टक्के, वाणिज्य ९७.०५ टक्के, के. एल. ई. कॉलेज कळंबोली विज्ञान शाखेत ९१.६१ टक्के, वाणिज्य ९८.७१ टक्के निकालाची नोंद झाली आहे.>कोकण विभागाचा निकाल ९३.२३%विभागवार निकालामध्ये कोकण विभागाचा निकाल ९३.२३ टक्के लागून आहे. रायगड जिल्ह्याचा निकाल ८४.९७ टक्के लागला असून सर्व शाखांच्या एकूण ३०,८३५ विद्यार्थ्यांनी परीक्षा अर्ज भरले होते. त्यापैकी ३०,८०१ विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष परीक्षा दिली. त्यापैकी विशेष गुणवत्ता श्रेणीत १२६०, प्रथम श्रेणीत ६१७२, द्वितीय श्रेणीत १६,५५३ तर उत्तीर्ण श्रेणीत २१८८ असे ८४.९७ टक्के म्हणजे एकूण २६,१७३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यामध्ये ७७.३२ टक्के मुले तर ८९.९९ टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत.
बारावीचा निकाल ८९ टक्के, शहरात यंदाही मुलींचीच बाजी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2019 11:54 PM