गोमांस विक्री प्रकरणातील आरोपी हद्दपार
By Admin | Published: January 3, 2017 05:52 AM2017-01-03T05:52:40+5:302017-01-03T05:52:40+5:30
गोमांस विक्री प्रकरणात सापडलेल्या सराईत गुन्हेगाराला हद्दपार करण्यात आले आहे. त्याच्यावर सानपाडा व कोपरखैरणे पोलीस ठाण्यात सहा गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे
नवी मुंबई : गोमांस विक्री प्रकरणात सापडलेल्या सराईत गुन्हेगाराला हद्दपार करण्यात आले आहे. त्याच्यावर सानपाडा व कोपरखैरणे पोलीस ठाण्यात सहा गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. सद्यस्थितीला देखील त्याच्याकडून कायद्याचे उल्लंघन होत असल्यामुळे त्याला हद्दपार करण्यात आले आहे.
रिझवान शरीफ शेख (४२) असे हद्दपार करण्यात आलेल्या गुन्हेगाराचे नाव आहे. कोपरखैरणे पोलिसांनी यापूर्वी त्याला गोमांस विक्री प्रकरणी अटक केलेली आहे. गोमांस विक्रीविरोधी कायदा झाल्यानंतरची ती पहिलीच कारवाई होती. राजकीय वरदहस्त वापरून त्याच्याकडून उघडपणे गोमांस विक्री सुरू होती. खैरणे गावातील त्याच्या या ठिकाणाची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश गायकवाड यांच्या पथकाने त्याच्यावर कारवाई केली होती. तसेच त्याच्या इतर साथीदारांनाही अटक केली होती. या कारवाईनंतर त्याने पोलिसांवर दबावतंत्र वापरण्यासाठी काही मंत्र्यांशी देखील मध्यस्थामार्फत संपर्क साधला होता. याच कालावधीत त्याच्यावर इतर तीन गुन्ह्यांची नोंद झालेली आहे. त्याशिवाय सानपाडा पोलीस ठाण्यातही त्याच्यावर दोन गुन्हे दाखल होते. अनेकदा नोटीस बजावूनही त्याला प्रतिसाद न देता गुन्हेगारी हालचाली सुरूच ठेवल्या होत्या. यामुळे समाजहितासाठी त्याला हद्दपार करण्याच्या प्रक्रियेला उपआयुक्त प्रशांत खैरे यांच्यामार्फत प्रक्रियेला सुरवात झाली होती. त्यानुसार नववर्षाच्या संध्येवर रविवारी त्याला हद्दपारीची नोटीस बजावून एक वर्षासाठी शहराबाहेर पाठवले आहे.