अरुणकुमार मेहत्रे
कळंबोली : पनवेल शहराकरिता असलेल्या अमरधाम स्मशानभूमीत बाहेरचे मृतदेह मोठ्या प्रमाणात अंत्यविधीसाठी आणले जात आहेत. त्यामुळे येथील यंत्रणेवर अतिरिक्त भार पडत आहे. त्याचबरोबर एकाच वेळी जास्त मृतदेह आल्याने मृतांच्या नातेवाइकांना ताटकळत राहावे लागते. आजूबाजूच्या गावांमधील स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कार करू दिले जात नसल्याने मृतांच्या नातेवाइकांची मोठी गैरसोय होत आहेत.
पनवेल शहरात अमरधाम ही एकमेव स्मशानभूमी आहे. या स्मशानभूमीत संपूर्ण तालुक्यातील मृतांवर अंत्यसंस्कार केले जातात. सिडको वसाहतींमध्ये स्मशानभूमीकरिता भूखंड राखीव आहे, तसेच कळंबोली, कामोठे, खारघर येथे स्मशानभूमीसुद्धा आहेत. याशिवाय आजूबाजूच्या परिसरात म्हणजेच गावांमध्येही इमारती उभारल्या आहेत. या ठिकाणी विविध प्रांतातून आलेले लोक राहत आहेत. एकूणच दिवसेंदिवस येथील लोकसंख्या वाढत आहे. त्याचा ताण उपलब्ध पायाभूत सुविधांवर पडत आहे. सध्या स्मशानभूमीचा विषय वादाचा ठरला आहे. काही गावांमध्ये आजूबाजूच्या इमारतीमध्ये एखादी व्यक्ती मयत झाली तर त्याचा अंत्यविधी स्थानिक ग्रामस्थ गावातील स्मशानभूमीमध्ये करू देत नाहीत. त्यामुळे हे मृतदेह अंत्यविधीसाठी पनवेल येथील अमरधाम स्मशानभूमी मध्ये आणले जातात. यावरून अनेकदा वाद निर्माण झाले आहेत. सध्या येथील अमरधाम स्मशानभूमीत पनवेलसह सुकापूर, कामोठे, आदई, करंजाडे, नांदगाव, विहिघर, कोप्रोली, वलप कळंबोली, चिंचपाडा, पोयंजे, मोरबे, चिपळे, बारापाडा, माळेवाडी, धानसर, वाकडी, नेरे, उसर्ली, उलवे आदी ठिकाणाहून अंत्यविधीसाठी मृतदेह आणले जातात. ही संख्या मोठी असल्याने त्याचा अतिरिक्त ताण स्मशानभूमी आणि तेथील कर्मचाऱ्यांवर पडत आहे. अंत्यविधीसाठी बाहेरून आणल्या जाणाºया मृतदेहामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे.खांदा कॉलनीतील स्मशानभूमी कागदावरचखांदा कॉलनीत बालभारती जवळ स्मशानभूमीसाठी भूखंड राखीव आहे; परंतु बाजूच्या रहिवाशांचा त्याला विरोध आहे. त्यामुळे आजपर्यंत येथे स्मशानभूमी उभारू शकली नाही, त्यामुळे या कॉलनीतील अंत्यविधीचा भार अमरधाम स्मशानभूमीवर पडत आहे. गेल्या सहा महिन्यांत या परिसरातील ४० पेक्षा अधिक मृतदेहांवर अमरधाम स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत.सात महिन्यांत ३०० मृतदेहांवर अंत्यविधीमागील सात महिन्यांत अमरधाम स्मशानभूमीत एकूण ३०० मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. इतर शहरांच्या तुलनेत हा आकडा मोठा आहे. यापैकी १९३ मृतदेह पनवेल शहराबाहेरचे आहेत, तर शहरातील मृतदेहांचा आकडा १०७ असल्याचे संबंधित विभागाकडून सांगण्यात आले.पनवेल परिसरातून महामार्ग जात आहेत. या ठिकाणी अपघाती मृत्यूंचे प्रमाण जास्त आहे, त्यामुळे सहाजिकच अमरधाम स्मशानभूमीमध्ये अंत्यविधीसाठी जास्त मृतदेह येतात. त्याचबरोबर बाहेरील गावांमध्ये स्मशानभूमीवरून वाद आहेत. ही परिस्थितीही याला कारणीभूत आहे. मानवतेच्या दृष्टिकोनातून कोणत्याही मृतदेहावरील अंत्यविधीला नकार देता येत नाही, त्यामुळे अमरधाम स्मशानभूमीत परवानगी दिली जाते. त्यामुळे येथील उपलब्ध सुविधांवर व तेथील कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त ताण पडतोय, ही बाब खरी आहे.- शैलेश गायकवाड,आरोग्य निरीक्षक, पनवेल, महानगरपालिका