शहरात ३७,३१३ नवीन वाहनांची भर
By ऑनलाइन लोकमत | Published: March 4, 2019 01:35 AM2019-03-04T01:35:15+5:302019-03-04T01:35:23+5:30
वाहनतळाचे नियोजन फसलेल्या सुनियोजित नवी मुंबई शहरात वाहनांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे.
- अनंत पाटील
नवी मुंबई : वाहनतळाचे नियोजन फसलेल्या सुनियोजित नवी मुंबई शहरात वाहनांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. सरत्या आर्थिक वर्षात वाशी उपप्रादेशिक परिवहन (आरटीओ) कार्यालयाकडे ३७३१३ नवीन वाहनांची नोंदणी झाली आहे. यात सर्वाधिक दुचाकी वाहनांची संख्या आहे. विशेष म्हणजे, महिन्याला सरासरी ३ हजार ७00 इतके नवीन वाहन नोंदणीचे प्रमाण आहे. नवीन वाहनांची ही वाढती संख्या शहरातील वाहतुकीवर अतिरिक्त ताण निर्माण करणारी असल्याचे जाणकारांचे मत आहे.
नवी मुंबई हे कॉस्मॉपॉलिटीन शहर म्हणून ओळखले जात आहे. माहिती व तंत्रज्ञानाच्या या शहरात रोजगाराच्या अनेक संधी आहेत. एकूणच शहरातील दरडोई उत्पन्न सरासरीपेक्षा अधिक आहे. त्यामुळे वाहन घेणे ही गरजेची किंंबहुना तितकीच हौसेची बाब बनली आहे. याचा परिणाम म्हणून प्रत्येक घरात एक चारचाकी व एक दुचाकी वाहन आढळून येते. नवीन वाहन खरेदीचे प्रमाण महिन्याला सरासरी पावणेचार हजार इतके असल्याचे आरटीओकडील नोंदीवरून स्पष्ट झाले आहे. वाशी आरटीओने दिलेल्या माहितीनुसार एप्रिल २0१८ ते जानेवारी २0१९ या ११ महिन्यांत तब्बल ३७,३१३ वाहनांची नोंदणी झाली आहे. यात १९,0१५ दुचाकी वाहनांचा समावेश आहे. तर खासगी चारचाकी वाहनांची संख्या ७२५४ इतकी आहे.
सिडकोने नवी मुंबई हे सुनियोजित शहर उभारले. अत्यावश्यक सुविधा निर्माण करण्यात आल्या. रस्ते, उद्याने, शैक्षणिक, आरोग्य व सांस्कृतिक सुविधा उपलब्ध करण्यात आल्या; परंतु वाढत्या लोकसंख्येनुसार वाहनतळाचे नियोजन करायचे राहून गेले. त्यामुळे शहरात रस्ते वाहतुकीचा बोजवरा उडाला आहे. वाहनतळाच्या पुरेशा सुविधा नसल्याने रस्त्याच्या कडेला वाटेल तशी वाहने उभी केली जातात. ही परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होताना दिसत आहे. कारण मुख्य रस्त्यांसह आता शहरातील वसाहतीअंतर्गत रस्तेही या वाहनांना अपुरे पडू लागले आहेत. शहरवासीयांचा आर्थिक स्तर उंचावल्याने बैठ्या चाळीसह झोपडपट्यांतूनही मालकी वाहनांचे प्रमाण वाढले आहे. चारचाकी वाहन हे आता स्टेटस सिंबॉल बनल्याने घरात दुचाकी असतानाही सुलभ हप्त्यावर चारचाकी वाहने खरेदी करण्याचा कल वाढल्याचे दिसून आले आहे.
याचाच परिणाम म्हणून दरवर्षी नवीन वाहनांच्या संख्येत भर पडत आहे. एप्रिल २0१८-जानेवारी २0१९ या आर्थिक वर्षात वाशी आरटीओकडे नोंदविल्या गेलेल्या वाहनांची संख्या मागील दोन-तीन वर्र्षांतील उच्चांक असल्याचे उपलब्ध आकडेवारीवरून स्पष्ट होते.
।रिक्षांचे प्रमाणही वाढले
वाशी आरटेओकडे एप्रिल २0१८ पर्यंत ४ लाख ६७ हजार ८३९ वाहनांची नोंदणी झाली आहे. यात २ लाख २९ हजार ४६४ दुचाकी तर १ लाख ३७ हजार ६६४ खासगी चारचाकी वाहनांचा समावेश आहे. १८ हजार ९२९ आॅटो रिक्षा आहेत. गेल्या वर्षापर्यंत नोंदविल्या गेलेल्या एकूण वाहनांच्या संख्येत सरत्या आर्थिक वर्षातील नवीन ३७ हजार ३१३ वाहनांची भर पडणार आहे.
>आरटीओला २२७ कोटींचा महसूल
एप्रिल २0१८ ते जानेवारी २0१९ या सरत्या आर्थिक वर्षात वाशी आरटीओसमोर २९६ कोटी ७ लाख रुपये महसूल वसुलीचे उद्दिष्ट होते. त्यापैकी ७६ टक्के म्हणजेच निर्धारित ध्येयापैकी २२७ कोटी ५२ लाख रुपयांचा महसूल गोळा करण्यात आरटीओला यश आले आहे.