अरुणकुमार मेहत्रे / कळंबोलीएमजेपीकडून करण्यात आलेली पाणीकपात त्याचबरोबर उन्हाळ्यात तीव्र पाणीटंचाई जाणवू नये याकरिता पनवेल महापालिकेने शहरात दोन झोन पाडून या ठिकाणी दिवसाआड पाणीपुरवठा सुरू केला होता. परंतु नागरिकांची ओरड पाहून प्रशासनाने तीन दिवस दररोज पाणी देण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचबरोबर इतर चार दिवसांत दोन दिवस जास्त दाबाने पाणी दिले जाणार आहे. पनवेलकरांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे.पनवेल पालिकेने शहराला पाणीपुरवठा करण्याकरिता १०० वर्षांपूर्वी धरण विकसित केले आहे. एकूण १५ किमी अंतरावर असलेल्या या धरणातून जलवाहिनीद्वारे शहराला पाणीपुरवठा करण्यात येतो. या जलाशयात एकूण ३.५७ दशलक्ष घनमीटर क्षमता पाणी साठवून ठेवण्याची क्षमता होती. मात्र पावसाळ्यात माथेरानच्या डोंगराहून पाण्याबरोबर वाहत येणारा गाळ धरणात बसल्यामुळे खोली कमी होत आहे. त्यामुळे पाणी साठवून ठेवण्याची क्षमताही कमी झालेली आहे. जुलै ते मार्च देहरंग धरणातून एकूण १२ एमएलडी पाणीपुरवठा करण्यात येतो. त्याचबरोबर उर्वरित पाणी एमजेपी आणि एमआयडीसीकडून घेण्यात येते. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण हा महापालिकेला पाण्याचा मुख्य स्रोत आहे. त्याशिवाय पनवेलकरांची तहान पालिका प्रशासन भागवू शकत नाही. परंतु एमजेपीची वाहिनी जीर्ण झालेली असल्याने तिला फुटीचे ग्रहण लागले आहे. तसेच टाटा पॉवर कंपनीकडून सुटीच्या दिवशी पाताळगंगा नदीत पाणी सोडले जात नसल्याने पात्रात पाण्याची कमतरता भासू लागलेली आहे. यामुळे एमजेपीला मागणीप्रमाणे पाणीपुरवठा करता येत नाही. त्यामुळे शहरवाशीयांना सुध्दा पूर्वीप्रमाणे मुबलक पाणी देता येता नाही. पनवेल शहराला सुमारे २७ एमएलडी पाण्याची गरज आहे. आजघडीला एमजेपी आणि एमआयडीसीकडून प्रत्येकी ८ आणि ७ एमएलडी पाणी प्राप्त होत आहे. म्हणजे एकूण १५ एमएलडी पाणी बाहेरून प्राप्त होत आहे. त्याच पाण्यावर पनवेलकरांची तहान भागविण्यात येत होती. झोन करून दिवसाआड पाणी देण्यात येत होते. परंतु आता तीन दिवस नियमित पाणीपुरवठा करण्याचा निर्णय पाणीपुरवठा विभागाने घेतला आहे.
योग्य नियोजनातून पाणीटंचाईवर मात
By admin | Published: April 25, 2017 1:24 AM