नवी मुंबई : वाशीतील इनॉर्बिट मॉलजवळ असलेल्या महापालिकेच्या वाहनतळावर अवजड वाहनांनी कब्जा केला आहे. त्यामुळे खासगी वाहनधारकांना आपली वाहने पार्क करण्यासाठी शेजारच्या रस्त्याचा वापर करावा लागत आहे. या प्रकाराकडे महापालिकेच्या संबंधित विभागाने दुर्लक्ष केले आहे.रेल्वे स्थानक परिसरातील मॉल्स व पंचतारांकित हॉटेल्समुळे या भागात नेहमीच वाहनांची वर्दळ असते. पार्किंगच्या पुरेशा सुविधा नसल्याने वाहनधारक वाटेल तेथे वाहने पार्क करतात. त्यामुळे नेहमीच वाहतूक कोंडी होते. या परिस्थितीवर तोडगा काढण्याच्या दृष्टीने इनॉर्बिट मॉलच्या शेजारी सायन-पनवेल मार्गाला लागून असलेल्या भूखंडावर महापालिकेने पे अॅण्ड पार्क सुरू केले आहे. त्यासाठी खासगी ठेकेदाराची नेमणूक करण्यात आली आहे. मात्र या पार्किंगचा उपयोग खासगी वाहनधारकांपेक्षा मालवाहू अवजड वाहनांना अधिक होत आहे. विशेष म्हणजे सायन-पनवेल मार्गावरून मुंबईकडे जाणाऱ्या वाहनांना पामबीच मार्गावर येण्यासाठी याच पार्किंगसमोरून रस्ता आहे. त्यामुळे सायन -पनवेल मार्गावरून पामबीचकडे वळण घेणाऱ्या वाहनांना अडथळा निर्माण होतो. प्रसंगी अपघाताची शक्यता वाढली आहे. ठेकेदाराला समज देऊन वाहनतळ खासगी वाहनांसाठी खुले करावे, अशी मागणी करण्यात येत आहे. (प्रतिनिधी)
वाशीतील पार्किंगवर अवजड वाहनांचा ताबा
By admin | Published: July 13, 2015 2:46 AM