गृहनिर्माण प्रकल्पाच्या कामाची पाहणी; सिडकोची ९५ हजार घरे
By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2019 11:08 PM2019-12-12T23:08:07+5:302019-12-12T23:08:32+5:30
व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी घेतला आढावा
नवी मुंबई : सिडकोच्या माध्यमातून ९५ हजार घरांची योजना जाहीर करण्यात आली आहे. चार टप्प्यात ही महागृहनिर्मिती केली जाणार आहे. त्यासाठी जागा आणि कंत्राटदारही नियुक्त करण्यात आले आहेत. त्यानुसार कामाला सुरुवातही करण्यात आली आहे. सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी गुरुवारी या गृहप्रकल्पांना भेट देऊन आढावा घेतला.
सर्वांसाठी घरे या उद्दिष्टपूर्तीअंतर्गत सिडकोने ९५ हजार घरांचा प्रकल्प हाती घेतला आहे. परिवहन केंद्रित विकास संकल्पनेवर सिडकोने ही महागृहनिर्माण योजना जाहीर केली आहे. नवी मुंबईतील विविध बस व ट्रक टर्मिनल्स आणि रेल्वे स्थानकांचा फोर कोर्ट एरियामध्ये ही ९५ हजार घरे बांधली जात आहेत. यात तळोजा, खारघर, कळंबोली, नवीन पनवेल येथील बस टर्मिनल्स, कळंबोली व वाशी येथील ट्रक टर्मिनल आणि सानपाडा, जुईनगर, खारघर, बामणडोंगरी, खारकोपर, मानसरोवर व खांदेश्वर रेल्वे स्थानकांचा समावेश आहे. सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी गुरुवारी खारघर, खारकोपर रेल्वे स्थानक, बामणडोंगरी रेल्वे स्थानक, तळोजा येथील बांधकाम प्रकल्पाची पाहणी केली.
या वेळी सिडकोच्या मुख्य अभियंता संजय चौटालिया, अधीक्षक अभियंता रमेश गिरी, राजाराम नायक, एम. पी. पुजारी व संबंधित कंत्राटदारांचे प्रतिनिधी उपस्थित होते. हक्काच्या घराचे स्वप्न पाहणाऱ्या सर्वसामान्यांसाठी ही सुवर्णसंधी असल्याचे लोकेश चंद्र यांनी या वेळी स्पष्ट केले. ही सर्व घरे पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि अल्प उत्पन्न घटकांसाठी असल्याचे त्यांनी सांगितले.
९५ हजार घरांचे चार टप्पे
पहिल्यात टप्प्यात २०,४४८ तर दुसºया टप्प्यात २१,५६४ घरे बांधली जाणार आहेत. तिसºया आणि चौथ्या टप्प्यात अनुक्रमे २१,५१७ आणि २३,४३२ घरे बांधण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे आणखी ७,९०५ घरांच्या निर्मितीचीही योजना प्रस्तावित करण्यात आली आहे. या सर्व घरांचे बांधकाम एकाच वेळी सुरू करण्याची योजना असल्याचे सिडकोने कळविले आहे.