लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई : खारघर येथे भरधाव रिक्षाचा अपघात होऊन चौघे जखमी झाल्याची घटना घडली आहे. यामध्ये ९ वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला आहे. खारघरमध्ये रविवारी झालेल्या अश्वमेघ यज्ञाला उपस्थित राहून सर्वजण घरी जाण्यासाठी खारघर स्थानकाकडे येताना हा अपघात घडला.
रिक्षा चालकांच्या बेशिस्तपणामुळे सतत अपघाताच्या घटना घडत असतात. अशाच प्रकारातून खारघरमध्ये अपघात घडवून ९ वर्षीय मुलाचे प्राण गमावले आहेत. भिवंडी येथे राहणारे घनश्याम नायक व ऋषिकेश दुबे सहकुटुंब खारघरमधील अश्वमेघ यज्ञासाठी आले होते. दुपारच्या सुमारास सर्व विधी उरकून दोन्ही कुटुंबे घराकडे चालले होते. यासाठी ते एकाच रिक्षाने खारघर स्थानकाकडे येत होते. यावेळी रिक्षात दुबे पती पत्नी व नायक यांची पत्नी व ९ वर्षाचा मुलगा दिव्याप्रसाद असे बसलेले होते. रिक्षा चालक सतीश उत्तेकर (२८) याच्याकडून अति वेगात रिक्षा पळवली जात असताना त्याचे नियंत्रण सुटून रिक्षा दुभाजकाला धडकून अपघात झाला.
यामध्ये सर्वजण गंभीर जखमी झाले असता त्यांना रुग्णालयात दाखल केले होते. यावेळी डॉक्टरांनी दिव्याप्रसाद (९) याला मृत घोषित केले. तर इतर तिघांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. याप्रकरणी रिक्षा चालक सतीश उत्तेकर याच्यावर खारघर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर मार्गावर रिक्षा चालकांच्या वेगावर नियंत्रण नसल्याच्या तक्रारी यापूर्वी देखील येत होत्या. अखेर अति वेगामुळे अपघात घडून चिमुकल्याला प्राण गमवावे लागले आहेत.