ठाणे : पुरस्कार हे आम्हा कलाकारांच्या जगण्याचे टॉनिक आहे. पुरस्कारामुळे प्रोत्साहन तर मिळतेच, परंतु रसिकांशी बातचीत करण्याची संधीही मिळते, अशा भावना ज्येष्ठ सिनेनाट्य अभिनेते भालचंद्र कुलकर्णी यांनी व्यक्त केल्या. जनकवी पी. सावळाराम पुरस्कार स्वीकारल्यानंतर ते सत्काराला उत्तर देताना बोलत होते.ठाणे महानगरपालिका व जनकवी पी. सावळाराम कला समितीतर्फे रविवारी गडकरी रंगायतन येथे जनकवी पी. सावळाराम स्मृती पुरस्कार सोहळा झाला. कुलकर्णी म्हणाले की, पी. सावळाराम यांची प्रतिभा दिसते; पण त्यांनी केलेला संघर्ष हा अनेकांना माहीत नाही. ते एक प्रेमकवी, भक्तिगीत लिहिणारे कवी होते; पण त्याचबरोबर बंडखोर कवीदेखील होते, असे मत त्यांनी व्यक्त केले. याआधी जनकवी पी. सावळाराम स्मृती पुरस्कार सुरेश वाडकर, यशवंत देव, शिवाजी साटम यासारख्या अनेक दिग्गजांना मिळाला आहे आणि आज हा पुरस्कार मला देऊन त्यांच्या पंक्तीत बसवले आहे. याबद्दल मी कृतार्थ आहे. शहर स्वच्छ ठेवण्याबरोबर शहराची सांस्कृतिक भूक भागवायची असते, हे अनेक महापौरांना माहीत नसते; पण ठाण्याचे महापौर हे मात्र चांगलेच जाणतात, अशा शब्दांत महापौरांचे कौतुकही त्यांनी केले. अभिनेत्री माया जाधव यांनी रसिक तर सगळीकडेच असतात; पण कलाप्रेमी असणे महत्त्वाचे असते आणि ठाणेकर हे कलाप्रेमी आहेत, अशा शब्दांत ठाणेकरांचे कौतुक केले. या वर्षीच्या गंगाजमुना पुरस्काराने माया जाधव यांना सन्मानित करण्यात आले. यावेळी अभिनेता मंगेश देसाई यांना लक्षवेधी कलाकार म्हणून, प्रसिद्ध कवी सतीश सोळांकूरकर, आदर्श शिक्षक ग.ह.पेंडसे यांनाही जनकवी पी. सावळाराम विशेष पुरस्काराने गौरवण्यात आले. महापौर संजय मोरे यांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात आले. यावेळी कवी अशोक बागवे, जनकवी पी. सावळाराम कला समितीच्या अध्यक्षा डॉ. कल्पना पाठारे, विश्वस्त संजय पाटील, उपायुक्त संदीप माळवी उपस्थित होते. शेवटी कला सरगम, सातारा प्रस्तुत ‘कल्पवृक्ष कन्येसाठी’ हा कार्यक्रम पार पडला. (प्रतिनिधी)
भालचंद्र कुलकर्णी यांना पी. सावळाराम पुरस्कार प्रदान
By admin | Published: December 26, 2016 6:56 AM