महाडमध्ये पावसामुळे भातशेतीचे नुकसान
By admin | Published: October 4, 2016 02:48 AM2016-10-04T02:48:12+5:302016-10-04T02:48:12+5:30
गेले दोन दिवस महाड तालुक्यात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. यामुळे हळवी भात कापणीच्या स्थितीत असल्याने अनेक ठिकाणी पीक आडवे झाले आहे
दासगाव/महाड : गेले दोन दिवस महाड तालुक्यात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. यामुळे हळवी भात कापणीच्या स्थितीत असल्याने अनेक ठिकाणी पीक आडवे झाले आहे. हाती आलेला घास जाण्याची शक्यता असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.
गेल्यावर्षी संपूर्ण राज्यात पाऊस कमी प्रमाणात होता. यामुळे अनेक ठिकाणी धरणाच्या पाण्याची पातळी कमी झाली होती. महाड तालुक्यात बहुतेक गावांमध्ये मोठ्याप्रमाणात पाणीटंचाई निर्माण झाली होती. यंदा मात्र महाड तालुक्यात गेल्या वर्षीपेक्षा दुप्पट पाऊस झाला आहे. गेल्या वर्षी यावेळी २०९२ मि.मी. नोंद झाली होती तर यंदा ४१३१ मि.मी. एवढी दुप्पट नोंद झाली आहे. सध्या या पावसामुळे कापणीसाठी तयार झालेल्या हळवी भात शेतीचे नुकसान होण्याची शक्यता असून काही ठिकाणी पीक झोपले आहे. शेतामध्ये पाण्याच्या वहाळा वाहत आहेत. सध्या गेली दोन दिवस मोठ्याप्रमाणात महाड तालुक्यात लागणाऱ्या पावसामुळे शेतकरी हादरून गेला आहे. हातातोंडाशी आलेले पीक जाण्याच्या मार्गी लागल्यामुळे शेतकऱ्यांनी धसका घेतला आहे. तरी शासनाने नुकसानीचे पंचनामे करून मदत जाहीर करावी अशी अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त के ली.