नवी मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मसाला मार्केटमधील समस्या वाढू लागल्या आहेत. मार्केटमध्ये उभ्या केलेल्या टेम्पोमधून चक्क ८०,१५० रुपयांच्या डाळी व कडधान्याची चोरी झाली असून सुरक्षा व्यवस्था कडक असताना चोरी झालीच कशी, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. बाजार समितीच्या मसाला मार्केटमध्ये नियम धाब्यावर बसवून बेकायदेशीर कामे सुरू आहेत. दिवाळीदिवशी मार्केटमध्ये आग लागल्यानंतर व्यापाऱ्यांनी दुकानांवर विनापरवाना शेड टाकल्याचे निदर्शनास आले होते. ज्या व्यवसायांना परवानगी नाही तेही या ठिकाणी केले जात आहेत. १६ नोव्हेंबरला मार्केटमधील बी विंगसमोर उभ्या केलेल्या टेम्पोमध्ये चोरी झाली आहे. भिवंडीमधील वाहतूकदाराने डाळी व कडधान्याने भरलेला टेम्पो सोमवारी मार्केटमध्ये उभा केला होता. रात्री चोरट्यांनी टेम्पोची रस्सी सोडून डाळी व कडधान्य असा ८०,१५० रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. एपीएमसी पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. डाळी व कडधान्याच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. सामान्य नागरिकांना डाळ घेणेही परवडेनासे झाले आहे. यामुळे चोरट्यांनी डाळी, कडधान्यांच्या वाहनांवरही लक्ष केंद्रित करण्यास सुरवात केले आहे. मसाला मार्केटमध्ये डाळीचा टेम्पो का उभा करण्यात आला होता, त्यासाठी परवानगी होती का, याविषयी प्रश्न उपस्थित केले जात आहे. मार्केटमध्ये प्रत्येक गेटवर सुरक्षा रक्षक असताना व थोड्या अंतरावर पोलीस स्टेशन असताना चोरी झालीच कशी, असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे.
एपीएमसी मसाला मार्केटमध्ये डाळींची चोरी
By admin | Published: November 23, 2015 1:10 AM