पामबीचवरील गॅरेजेस पुन्हा सुरू
By ऑनलाइन लोकमत | Published: April 7, 2019 11:45 PM2019-04-07T23:45:34+5:302019-04-07T23:45:41+5:30
महापालिकेचे दुर्लक्ष: वाहतूककोंडीमुळे वाहनधारक त्रस्त
नवी मुंबई : वाशी पामबीच मार्गावरील गॅरेजेस आणि वाहनांच्या स्पेअर पार्टची दुकाने पुन्हा सुरू झाली आहेत. या दुकानांमुळे या मार्गावरील वाहतुकीला अडथळा होत आहे. त्यामुळे महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांनी गेल्या वर्षी विशेष मोहीम काढून येथील दुकाने बंद केली होती; परंतु आता पुन्हा ही दुकाने सुरू झाली आहेत. या प्रकाराला महापालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांचे अर्थपूर्ण पाठबळ असल्याचा आरोप वाहनधारकांकडून केला जात आहे.
एपीएमसीच्या हद्दीत पामबीच मार्गावरील सत्रा प्लाझा इमारतीपर्यंत गॅरेज व वाहनांच्या स्पेअर पाटर््स विक्रीच्या दुकानांची बजबजपुरी झाली आहे. वाहने रस्त्यावर उभी करून दुरुस्तीची कामे केली जातात. त्यामुळे पामबीच मार्गावरील वाहनांच्या गतीला ब्रेक लागत आहे. याचा परिणाम म्हणून या क्षेत्रात नियमित वाहतूककोंडीची समस्या भेडसावत आहे.
विशेष म्हणजे पामबीच मार्गावर वाहनांची पार्किंग करण्यास मनाई आहे. शिवाय या परिसरात असलेली कार्यालये, दुकानांसाठी मागच्या बाजूने प्रवेश आहे; परंतु नियमाला हरताळ फासत येथील गाळेधारकांनी पामबीच मार्गाच्या दिशेने प्रवेश सुरू केले आहेत.
पामबीच मार्गावरील वाहतुकीला याचा फटका बसत आहे. यासंदर्भातील वाढत्या तक्रारी लक्षात घेऊन महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांनी गेल्या वर्षी वाहतूक पोलिसांच्या साहाय्याने धडक मोहीम राबवून या परिसरातील सर्व गॅरेजेस आणि स्पेअर पार्ट विक्रीच्या दुकानांना टाळे ठोकले होते. ही दुकाने पुन्हा सुरू होऊ नयेत, यासाठी पदपथावर लोखंडी बॅरियर उभारले होते. या विशेष कारवाईमुळे या परिसरातील वाहतूक सुरळीत झाली होती; परंतु कारवाईनंतर काही दिवसांतच बंद करण्यात आलेली ही दुकाने पुन्हा सुरू झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
पदपथावर वाहन दुरुस्ती
पामबीच मार्गावर वाहने उभी करून सर्रासपणे दुरुस्तीची कामे केली जातात. अनेकदा पदपथांचाही वापर केला जातो. पदपथांवर खासगी वाहने उभी केली जात असल्याने पादचाऱ्यांना रस्त्यांवरून चालण्याची कसरत करावी लागत आहे. त्यामुळे वाहतूककोंडीसह अपघाताची शक्यता बळावली आहे. याप्रकरणी तातडीने कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे. वाहतूककोंडीचा त्रास, अपघाताची शक्यता आहे.