लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : पामबीच रोडवर किल्ला जंक्शन ते वाशी सेक्टर १७पर्यंतच्या रोडवर मायक्रो सर्फेसिंग लेयर टाकून सुधारणा करण्याच्या प्रस्तावास स्थायी समितीने मंजुरी दिली आहे. ७ कोटी ४८ लाख रुपये खर्च करून, हे काम केले जाणार असून पुढील तीन महिन्यात काम पूर्ण केले जाणार आहे. नवी मुंबईमध्ये सायन-पनवेल महामार्गावरील वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी पामबीच रोड तयार करण्यात आला आहे. वाशी ते सीबीडीपर्यंत ९ किलोमीटरच्या रोडवर छोटी वाहने वेगाने जात असल्याने अनेक वेळा अपघात होत असतात. यामुळे महापालिकेच्या वतीने या रोडची देखभाल दुरुस्ती वेळच्या वेळी केली जाते. रोडवरील पृष्ठभाग अनेक ठिकाणी खराब झाला असून, पावसाळ्यात खड्डे पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अतिवेगाने अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली असल्याने महापालिकेने मायक्रो सर्फेसिंग लेयरचा वापर करून रोडची दुरुस्ती करण्याचा निर्णय घेतला. या तंत्राद्वारे काम केल्याने पर्यावरणपूरक फायदे अनेक आहेत. प्रचलित पद्धतीने काम केल्यास अस्तित्वातील थर काढावे लागणार व त्यामुळे डेब्रिज तयार होऊन त्याचीही विल्हेवाट लावावी लागणार. जुन्या पद्धतीने काम करताना वेळ जास्त लागून वाहतूककोंडीही होण्याची शक्यता आहे. नवीन तंत्राचा वापर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नवीन पद्धतीमध्ये मायक्रो सर्फेसिंग लेयर टाकणे, लेन मार्किंग करणे, टॅककोट मारणे, साइन बोर्ड बसविणे, कॅट आइज बसविणे, कर्बस्टोनला आॅईलपेंट मारणे या बाबींचा समावेश आहे. स्थायी समितीने या कामाला नुकतीच मंजुरी दिली. यासाठी ७ कोटी ४८ लाख एवढा खर्च होणार आहे. पुढील तीन महिन्यांमध्ये हे काम केले जाणार आहे. या विषयावर चर्चा करताना पामबीच रोडवरील वृक्ष सुकत असल्याचे नगरसेवकांनी निदर्शनास आणून दिले. कोकण कृषी विद्यापीठाच्या तज्ज्ञांचा सल्ला घेऊन योग्य उपाययोजना करणार असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त अंकुश चव्हाण यांनी सभागृहास दिली.
पामबीचवर मायक्रो सर्फेसिंग लेयर
By admin | Published: June 29, 2017 3:04 AM