लोकमत न्यूज नेटवर्कपनवेल : पुरोगामी विचारांच्या आघाडीने समोर ठेवलेला विकासनामा पाहून लोकांचा आघाडीवरचा विश्वास अधिक वाढत आहे. त्यामुळे पनवेल महापालिकेच्या निवडणुकीत आघाडीची त्सुनामी आहे, असा विश्वास खारघर येथे झालेल्या प्रचारसभेत उपस्थित नेत्यांनी व्यक्त केला.विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, शेकापचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील, आमदार भाई जगताप, राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक, माजी आमदार विवेक पाटील, आमदार धैर्यशील पाटील, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आर.सी. घरत, इंटकचे राष्ट्रीय सचिव महेंद्र घरत यांसह आघाडीचे उमेदवार व्यासपीठावर उपस्थित होते.यावेळी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, पनवेलच्या विकासासाठी आघाडीच्या सरकारने भरपूर निधी दिला आहे. मी स्वत: मुख्यमंत्री असताना त्यावेळचे आमदार प्रशांत ठाकूर काँगे्रसमध्ये असताना मोठ्या प्रमाणात निधी दिला. खारघरचा टोलप्रश्न घेऊन जेव्हा ठाकूर माझ्याकडे आले, तेव्हा स्थानिक लोकांच्या हिताच्या दृष्टीने आम्ही काही गावांना टोलमधून वगळून त्यांना दिलासा देण्याचा फॉर्म्युला आणला. तरीदेखील पक्षांतराच्या हालचाली सुरू झाल्या. वाढणाऱ्या महागाईमुळे सामान्य नागरिक आज नाराज आहे. भाजपा सरकार बुलेट ट्रेन आणत आहेत; पण मुंबई-गोवा महामार्गाचा प्रश्न यांना सोडवता आला नाही. त्यामुळे ही विचारांची लढाई आहे. जातीयवादी विरुद्ध पुरोगामी अशी लढाई आहे. महाआघाडीच्या उमेदवारांना विजयी करून पनवेलचा विकास घडवा, असे आवाहन चव्हाण यांनी अखेरीस केले. पनवेल महापालिकेमध्ये जो लोखंड बाजार येतो, त्यासाठी ५०० कोटींच्या सवलतीला आमचा त्याला विरोध नाही. पण त्याच्या बदल्यात जो निधी जे अनुदान राज्य शासनाने महापालिकेला द्यायला पाहिजे होते त्याचा एक रुपयासुद्धा मुख्यमंत्र्यांनी दिलेला नाही. मुख्यमंत्र्यांनी पनवेलकरांना मंत्रिपदाचे गाजर दाखवले आहे, आधी हक्काचे ५०० कोटी द्या, आम्ही आमचा विकास करू, असे स्पष्ट मत शेकापचे सरचिटणीस, आ. जयंत पाटील यांनी व्यक्त केले.
पनवेलमध्ये आघाडीचीच त्सुनामी!
By admin | Published: May 22, 2017 2:24 AM