वैभव गायकर
पनवेल - मागील दोन दिवसांपासून शहरात जोरदार पाऊस झाल्याने रविवारी (30 जून) पांडवकडा धबधब्यावर पर्यटकांनी मोठी गर्दी केली होती. विशेष म्हणजे बंदी झुगारून पर्यटकांनी पांडवकडा धबधब्यावर गर्दी केली.
वनविभागाने सुरक्षेच्या कारणास्तव पांडवकडा धबधब्यावर पर्यटकांना बंदी घातली आहे. मात्र पर्यटक याठिकाणी जाण्यास स्वतः ला रोखू शकत नसल्याची परिस्थिती पाहावयास मिळत आहे. रविवारी सुट्टीचा दिवस असल्याने पर्यटकांची संख्या जास्त आहे. पोलिसांना देखील पर्यटकांना आवर घालणे कठीण होऊ बसल्याचे पाहावयास मिळाले. अतिउत्साही पर्यटकांमुळेच वनविभागाने याठिकाणी बंदी घातली आहे. आजवर अनेक पर्यटकांना याठिकाणी आपला जीव गमवावा लागला आहे.
पांडवकडासारख्या नैसर्गिक ठिकाणी बंदी घातल्याने पर्यावरण प्रेमींनी नाराजी व्यक्त केली आहे. शहरातील नगरसेवकांनी देखील पर्यटकांना घातलेली प्रवेश बंदी उठविण्याची मागणी वनविभागाकडे केली आहे. यामध्ये प्रभाग अ सभापती शत्रुघ्न काकडे, नगरसेविका लीना गरड, नगरसेवक गुरुनाथ गायकर, नगरसेवक प्रवीण पाटील, नगरसेवक नरेश ठाकूर आदींचा समावेश आहे.
अतिउत्साही पर्यटक पांडवकडा धबधब्यावर येऊन मद्यपान करून धिंगाणा घालत असतात. अशा पर्यटकांमुळेच धबधब्यावर बंदी घालण्यात आली आहे. रविवारी पांडवकडा धबधबा परिसरात दारूच्या बाटल्यांचा खच पडलेला पाहावयास मिळाला आहे.