कोपरखैरणेत दरोडेखोरांची दहशत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2018 05:13 AM2018-04-25T05:13:32+5:302018-04-25T05:13:32+5:30
रहिवाशांनी घेतला धसका : पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह, टोळक्यांचा उपद्रव
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी मुंबई : कोपरखैरणे परिसरात दरोडेखोरांनी उच्छाद मांडला आहे. रात्रीच्या वेळी सोसायटीच्या सुरक्षारक्षकांना धमकावले जात आहे. झुंडशाहीचे प्रदर्शन करून बेमालूमपणे दुकाने व घरे फोडली जात आहेत. पोलिसांचा वचक न राहिल्याने दरोडेखोरांचे चांगलेच फावले आहे. गेल्या आठवड्यात सेक्टर १९ येथील एका सोसायटीत पडलेल्या दरोड्याच्या घटनेनंतर पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
कोपरखैरणे सेक्टर १९ येथील साईव्हिला कॉ-आॅप. हाउसिंग सोसायटीत गेल्या आठवड्यात घरफोडी झाली. या इमारतीच्या तळमजल्यावरील बी-३ हे कार्यालय फोडून चोरट्यांनी आतील रोख रक्कम व काही महत्त्वाची कागदपत्रे चोरून नेली. विशेष म्हणजे, पोलिसांची वेळीच मदत मिळाली असती तर दरोडा रोखता आला असता आणि दरोडेखोरांनाही जेरबंद करणे शक्य झाले असते. कारण दरोडेखोर कार्यालयात घुसल्याची कुणकुण इमारतीच्या सुरक्षारक्षकाला लागली होती. त्यानुसार त्यांनी इमारतीतील अन्य रहिवाशांना जागे केले. पाच ते सहा लोकांनी आरडाओरड केल्यानंतर कार्यालयात घुसलेल्या दोन दरोडेखोरांनी आपली स्कूटी तेथेच ठेवून पोबारा केला.
याच दरम्यान, इमारतीतील रहिवाशांनी पोलिसांना फोन करून या घटनेची माहिती दिली; परंतु पाऊण तास झाला तरी पोलिसांची मदत मिळाली नाही. दरम्यान, रहिवाशांनी ताब्यात घेतलेली स्कूटी परत घेण्यासाठी पळून गेलेल्या चोरटे आपल्या अन्य सहा ते सात साथीदारांसह चारचाकी वाहनातून पुन्हा इमारतीजवळ आले. गाडीतून उतरून त्यांनी रहिवाशांना धमकावण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या हातात लोखंडी रॉड होते. त्यामुळे रहिवाशांत काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले. बळाचा वापर करत दरोडेखोरांनी स्कूटीसह पुन्हा पलायन केले. एकूणच पोलिसांच्या दिरंगाईमुळे दरोडेखोर पळून जाण्यात यशस्वी ठरले.
दोन महिन्यांपूर्वी दरोडेखोरांनी याच सोसायटीतील एका मेडिकल स्टोअरवर डल्ला मारला होता. साईव्हिला सोसायटीतील या प्रातिनिधिक घटना असल्या तरी चोरट्यांनी कोपरखैरणे परिसरात उच्छाद मांडल्याचे दिसून आले आहे.
कोपरखैरणे परिसरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. रात्रीच्या वेळी मद्यपी दुचाकीस्वारांनी हैदोस घातला आहे. धूमस्टाईल गाड्या चालवून रात्रभर धिंगाणा घातला जात आहे. चौकाचौकांत मद्यपी टवाळखोर तरुणांचा धुडगूस सुरू असतो. सेक्टर १९ येथील संगम डेअरी चौकात हा प्रकार नेहमीचाच झाला आहे. ही बाब दरोडेखोरांच्या पथ्यावर पडल्याने घरफोडीच्या घटनांत वाढ होताना दिसत आहे.
माथाडींना धास्ती दरोड्याची
कोपरखैरणे परिसरात माथाडीची मोठी वसाहत आहे. बैठ्या चाळीतून राहणाऱ्या या माथाडींनी दरोखारांची चांगलीच धास्ती घेतली आहे. विशेष म्हणजे, बहुतांशी चाळीत दोन मजल्यापर्यंतचे वाढीव बांधकाम झाले आहे.
मागील काही दिवसांपासून दरोडेखोरांनी आपला मोर्चा या चाळीकडे वळविला आहे. सेक्टर ७ येथील एकाच चाळीतील चार ते पाच घरांत चोरी करण्यात आली. विशेष म्हणजे, ही चोरी दिवसाआड होत असल्याने आपला नंबर कधी लागेल, या धास्तीने रात्रीची झोप उडाल्याची प्रतिक्रिया एका रहिवाशाने दिली.
रात्रीची गस्त वाढविण्याची मागणी
दरोड्याच्या घटनांना प्रतिबंध घालण्यासाठी रात्रीच्या वेळी गस्त वाढविण्याची मागणी रहिवाशांकडून केली जात आहे. विशेष म्हणजे, ठिकठिकाणी पोलीस चौक्या उभारण्यात आल्या आहेत; परंतु यातील बहुतांशी चौक्या बंद असतात. त्यामुळे किमान रात्रीच्या वेळी या चौक्यांत एक-दोन पोलीस कर्मचारी तैनात केल्यास दरोडेखोरांवर काही प्रमाणात वचक बसेल, असे रहिवाशांचे म्हणणे आहे.
उन्हाळ्याची सुट्टी चोरट्यांच्या पथ्यावर
शाळा आणि महाविद्यालयाला सध्या सुट्ट्या लागल्या आहेत. या सुट्ट्यात बहुतांशी चाकरमानी आपल्या कुटुंबीयांसह गावी किंवा अन्य ठिकाणी फिरायला जातात. ही बाब दरोडेखोर आणि चोरट्यांच्या पथ्यावर पडण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी अधिक सतर्क राहण्याची गरज सर्वसामान्य नागरिकांकडून व्यक्त होत आहे. विशेषत: माथाडी वसाहती, गाव गावठाणांत गस्त वाढविणे गरजेचे आहे.