ज्वेलर्सवरील दरोड्यामुळे कामोठे, पनवेल हादरले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2018 02:50 AM2018-05-19T02:50:02+5:302018-05-19T02:50:02+5:30
कामोठे सेक्टर ३६ मधील न्यू बालाजी ज्वेलर्सवर गुरुवारी रात्री दरोडा पडला. दरोडेखोरांनी मालकावर चॉपरने हल्ला करून तब्बल तीन किलो सोने, दागिन्यांसह तब्बल ६५ लाखांचा ऐवज पळविला आहे.
पनवेल : कामोठे सेक्टर ३६ मधील न्यू बालाजी ज्वेलर्सवर गुरुवारी रात्री दरोडा पडला. दरोडेखोरांनी मालकावर चॉपरने हल्ला करून तब्बल तीन किलो सोने, दागिन्यांसह तब्बल ६५ लाखांचा ऐवज पळविला आहे. दरोडा टाकण्यापूर्वी दुकानाची रेकी केल्याचे सीसीटीव्ही फुटेजवरून स्पष्ट झाले आहे.
रात्री १0 च्या सुमारास ज्वेलरीचे मालक सुमेश जैन हे दुकान बंद करत होते. या वेळी काचेमध्ये डिस्प्ले केलेले दागिने काढून जैन यांनी बॅगेत ठेवले होते. याच दरम्यान दुचाकीवर आलेल्या दोन चोरट्यांनी दुकानात प्रवेश केला व जैन यांना चॉपरचा धाक दाखवत त्यांच्यावर वार केले. यात जैन जखमी झाले. याच संधीचा फायदा उचलत दुकानातील तब्बल तीन किलो सोने घेऊन चोरटे दुचाकीवरून पसार झाले आहेत. या घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त राजेंद्र माने, सहायक पोलीस आयुक्त प्रकाश निलेवाड यांनी घटनास्थळी भेट दिली. विशेष म्हणजे आदल्या दिवशी संध्याकाळी ७ वाजता आरोपींनी याच बालाजी ज्वेलर्समध्ये येऊन एक अंगठी खरेदी केली होती, तर दुसऱ्या दिवशी येऊन ज्वेलर्सवर दरोडा टाकत तीन किलो सोने लुटण्यात आले आहे. चोरी केल्यानंतर आरोपींनी ज्वेलर्समध्ये लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेºयाची हार्डडिस्क पळवून नेल्याने पोलिसांना तपासात अडथळा निर्माण झाला आहे. दुचाकीवरून आलेले आरोपी आजूबाजूच्या सीसीटीव्ही कॅमेºयात दिसतात का? याचा तपास कामोठे पोलीस करीत आहेत. दरम्यान, जखमी झालेल्या सुमेश जैन यांच्यावर कामोठेमधील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेनंतर परिमंडळ २ हद्दीतील पनवेल, नवीन पनवेल, खांदा वसाहत या परिसरातील ज्वेलर्समालकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
दरोडेखोरांनी या परिसरामध्ये रेकी केली होती. ज्वेलर्सचे दुकान कधी उघडले जाते, कधी बंद केले जाते, सुरक्षेसाठी काय उपाययोजना केल्या आहेत या विषयी सर्व आढावा घेतला होता. प्रत्यक्ष दुकानामध्ये जाऊन अंगठी खरेदी केली होती. दुकानामधील कॅमेºयासह सुरक्षेच्या सर्व उपाययोजनांची माहिती घेऊन दरोडा टाकला असून, पोलिसांनी आरोपींचा कसून शोध सुरू केला आहे.
>कलश ज्वेलर्स (कामोठे)
कामोठे येथील कलश ज्वेलर्सवर ६ जानेवारी २०१५ रोजी दरोडा पडला. तीन दरोडेखोरांनी चाकूने हल्ला करून मालकाला जखमी केले. कर्मचाºयांनाही मारहाण करण्याचा प्रयत्न करून दागिने घेऊन पळ काढला होता. गुरूवारीही याच घटनेची पुनरावृत्ती झाली आहे.
विशाल ज्वेलर्स (जुईनगर)
सेक्टर २४ मधील विशाल ज्वेलर्सवर ४ डिसेंबर २०१३ रोजी दरोडा पडला. दरोडेखोरांनी पिस्तुलाचा धाक दाखवून दीड किलो सोने चोरून पळ काढला होता. पाच जणांच्या टोळीने हा दरोडा टाकला होता.
>घणसोलीत दोघांची हत्या
१२ एप्रिल २०११मध्ये घणसोलीमधील रत्नदीप ज्वेलर्सवर दरोडा पडला. दरोडेखोरांनी दोन कामगारांची हत्या करून आतमधील दागिने व इतर साहित्य चोरून नेले होते. या घटनेमुळे नवी मुंबई पनवेलमध्ये खळबळ उडाली होती.
>बाबुल ज्वेलर्स फोडले
ऐरोली सेक्टर ३ मधील बाबुल ज्वेलर्सवर २८ सप्टेंबर २०१२ रोजी दरोडा पडला. दुकान बंद असल्याचे पाहून चोरट्यांनी दुकान फोडले व आतमधील लाखो रूपयांचे दागिने घेऊन पळ काढला होता.
>५१ लाखांचा दरोडा
मे २०१७मध्ये नेरूळ सेक्टर २३ दारावे गाव परिसरामधील मयूर ज्वेलर्स दुकानावर दरोडा पडला. चोरट्यांनी शेजारील दुकान भाड्याने घेऊन भुयार खोदले व आतमधील तब्बल ५१ लाख रूपये किमतीचे दागिने पळवून पळ काढला होता.