पनवेल : तालुक्यातील १४ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत शेकापने वर्चस्व कायम राखले आहे. १४ पैकी ८ ग्रामपंचायतींवर शेकापचे सरपंच निवडून आले, तर ५ ग्रामपंचायतींवर भाजपाचे उमेदवार निवडून आले आहेत. एका जागेवर भाजपा-शेकाप आघाडीचा उमेदवार निवडून आला आहे.ग्रामीण भागातून शेकापला अधिकचे यश मिळत आहे. ८ ग्रामपंचायतींमध्ये सरपंच निवडून आल्याने ग्रामीण भागातील शेकापचे वर्चस्व अधोरेखित झाले आहे. सोमवारी जसजसे निकाल लागत होते तसतसे भाजपा, शेकाप व काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते आपापल्या पक्षाचा झेंडा फडकवत होते. काही ग्रामपंचायतीमध्ये सदस्य म्हणून मनसेने देखील खाते खोलले आहे. विशेष म्हणजे एकमेकांचे प्रतिस्पर्धी असलेले शेकाप व भाजपा पक्ष हे न्हावे ग्रामपंचायतीत एकत्र लढले होते. शिवसेनेच्या विरोधात या ग्रामपंचायतीत शेकाप, भाजपा, काँग्रेस, मनसे अशी आघाडी झाली होती.आघाडीचे सरपंचपदाचे उमेदवार जितेंद्र म्हात्रे विजयी झाले, तर ओवळे ग्रामपंचायतीत शेकापने काँग्रेसच्या विरोधात रणशिंग फुंकले होते. या निवडणुकीत शेकापच्या रेश्मा मुंगाजी या विजयी झाल्या.शेकापचे ओवळे, वावेघर, तुराडे, दापोली, भिंगार, कसलखंड या ग्रामपंचायतीच्या सरपंचपदावर आपले उमेदवार विजयी झाले तर भाजपाने दुंद्रे, मालडुंगे, गुळसुंदे, चिखले, कोन या ग्रामपंचायतीवर आपले सरपंच निवडून आणले. न्हावे ग्रामपंचायतीत शेकाप व भाजपा ही वेगळीच आघाडी पाहावयास मिळाली. या आघाडीचे जितेंद्र म्हात्रे यांनी शिवसेनेच्या सरपंचपदाच्या उमेदवाराचा पराभव केला. तुराडे आणि वावेघर या दोन नव्या ग्रामपंचायतींमध्ये पहिल्यांदाच निवडणूक घेण्यात आली. या दोन्ही ग्रामपंचायतींवर शेकापचे सरपंच निवडून आले अहेत.
पनवेलमध्ये १४ पैकी ८ जागांवर शेकाप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2018 1:56 AM