पनवेल : केंद्र सरकारच्या शेतकरी, कामगार आणि जनविरोधी धोरणांच्या विरोधात मंगळवारी करण्यात आलेल्या आंदोलनाला पनवेलमध्ये संमिश्र प्रतिसाद मिळाला.शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या बंदमध्ये सहभागी झाले होते. पनवेल शहरातील शिवाजी चौकात केंद्र सरकारविरोधात निदर्शने करण्यात आली. या वेळी ‘मजदूर किसान एकता जिंदाबाद जिंदाबाद’, ‘बघता काय? सामील व्हा!’, ‘किसानविरोधी बिल मागे घ्या - मागे घ्या’, ‘अमित शहा हाय हाय’ आदी घोषणा देण्यात आल्या. या वेळी पनवेल पालिकेचे विरोधी पक्ष नेते प्रीतम म्हात्रे, कामगार नेते महेंद्र घरत, सुदाम पाटील, शिरीष घरत, आर. सी. घरत आदींसह मोठ्या संख्येने महाविकास आघाडीचे कार्यकर्ते उपस्थित होते. पनवेल शहरातील कृषी उत्पन्न बाजार समिती पूर्णपणे बंद होती. शहरातील मुख्य बाजारपेठ, काही दुकाने, मॉल्स या वेळी बंद होते. पनवेलसह खारघर, कामोठे, नवीन पनवेल, तळोजे या ठिकाणी दुकाने काही वेळ बंद ठेवण्यात आली होती. दुपारनंतर पालिका हद्दीतील बरीचशी दुकाने सुरू झाली.राज्यात महाविकास आघाडी विरुद्ध भाजप असे चित्र पाहावयास मिळत आहे. पनवेलमध्येदेखील भाजपच्या व्यापारी संघटनांनी या बंदला विरोध केल्याचे दिसून आले. खारघर शहरातील शेकाप नगरसेवक गुरुनाथ गायकर, मंगेश रनावडे यांनी शहरात निदर्शने केली.
कळंबोलीत बंदकळंबोली : केंद्र सरकारच्या कृषी विषयक धोरणाविरोधात दिल्लीत सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शविण्याकरिता कळंबोली, कामोठे परिसरातील व्यावसायिकधारकांनी स्वयंस्फूर्तीने आपली दुकाने बंद ठेवली होती. दरम्यान, भारत बंदला पनवेल महापालिका क्षेत्रातून समिश्र प्रतिसाद मिळाला. सकाळपासूनच दुकाने बंद ठेवल्याने परिसरात शांतता होती. दिवसभर कडकडीत बंद पाळण्यात आला.