- वैभव गायकरपनवेल : कळंबोली सुधागड शाळा परिसरात सापडलेल्या बॉम्बच्या घटनेमुळे पनवेल परिसरातील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. हा दहशतवाद्यांचा मोठा कट असल्याचे देखील बोलले जात आहे. सुदैवाने मोठी दुर्घटना टळली असली तरी या निमित्ताने सुरक्षिततेविषयीच्या त्रुटी समोर येऊ लागल्या आहेत. विशेषत: प्रत्येक पोलीसठाण्यात दहशतवादी विरोधी कक्ष असणे गरजेचे आहे; परंतु पनवेलमध्ये हा कक्ष कागदावरच असल्याचे दिसून आले आहे.दशहतवादी विरोधी कक्षात एक अधिकारी व दोन कर्मचाऱ्यांचा समावेश असतो. या कक्षामार्फत पोलीसठाण्याच्या हद्दीतील संशयित वस्तू, संशयित व्यक्ती आदीसह सुरक्षेबाबत सतर्कता राखण्याचे काम केले जाते. मात्र, कळंबोलीमधील घटनेत सुरक्षेच्या बाबतीत मोठा हलगर्जीपणा झाल्याचे समोर आले आहे. सुधागड शाळा सायन-पनवेल महामार्गाच्या हाकेच्या अंतरावर आहे. कळंबोलीच्या प्रवेशद्वाराजवळ नेहमीच पोलिसांची नाकाबंदी असते. अशा परिस्थितीत एवढ्या मोढ्या घटनेची कोणालाच कुणकुण लागली नाही. याबाबत आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. एका हातगाडीवर हे बॉम्ब ठेवण्यात आले होते. विद्यार्थ्यांना टार्गेट करण्यासाठी हे बॉम्ब ठेवल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. बॉम्बसोबत वायर्स, बॅटरी, डेटोनेटर आढळल्याने मोठ्या तयारीने संशयित आरोपीने हा प्रकार केला. घटनेतील संशयित आरोपी घटनेत वापरलेली हातगाडी वाहून नेतानाचे चित्रीकरण सीसीटीव्हीत कैद झाले आहे. संबंधित संशयित आरोपी डोक्यावर व तोंडावर कपडा बांधून मार्गक्र मण करताना या चित्रीकरणात दिसत आहे. संबंधित आरोपीने हा प्रकार अतिशय नियोजनबद्धरीत्या केल्याचे या प्रकरणातून उघड होत आहे. मात्र, या घडामोडी होत असताना पनवेलमधील दशहतवादी विरोधी कक्ष कुठे होता, हा प्रश्न उद्भवत आहे.लवकरच होणार उलगडाया घटनेतील आरोपीचा शोध घेण्याचे काम युद्घपातळीवर सुरू आहे. ज्या दुकानातून बॉम्बसाठी लागणाºया वस्तू खरेदी केल्या आहेत, त्या दुकानापर्यंत तपास यंत्रणा पोहोचली आहे. लवकरच महत्त्वाचा उलगडा होण्याची शक्यता आहे. अशा प्रकारच्या घटना टाळण्यासाठी प्रत्येक पोलीसठाण्यात नियमानुसार दशहतवादी विरोधी कक्ष कार्यरत करण्याची गरज असल्याचे मत जाणकारांकडून व्यक्त होत आहे.
पनवेलमध्ये दहशतवाद विरोधी कक्ष कागदावरच?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2019 1:13 AM