पनवेल : केंद्र शासनाने २०२२ पर्यंत सर्वांसाठी घरे या संकल्पनेच्या आधारे पनवेल महापालिकेने सकारात्मक कार्यवाही सुरू केली आहे. बुधवारी मंत्रालयात झालेल्या उच्चाधिकार समितीच्या बैठकीत महापालिकेच्या या संबंधीच्या चार प्रकल्प अहवालांना मंजुरी देण्यात आली.प्रधानमंत्री आवास योजनेसाठी महापालिकेला १२८४१ घरांचे उद्दिष्ट दिले आहे. त्यापैकी २३८७ घरांच्या चार प्रकल्पांच्या प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली आहे. या मंजूर प्रकल्पात लक्ष्मी वसाहतीतील ३७१, महाकाली नगरमधील ३४, वाल्मीकीनगर १३२, कच्छी मोहल्ला आणि पटेल मोहल्ला येथील ९४५ आणि परवडणाऱ्या घरांसाठी ९०४ घरांजा समावेश आहे. सदर प्रस्ताव प्रधानमंत्री आवास योजनेतील झोपडपट्टी पुनर्वसन योजनेअंतर्गत आहे. त्याच ठिकाणी पुनर्वसन करणे या घटकाखाली ४३४ आणि खासगी भागीदारीद्वारे १९५३ घरांची निर्मिती करण्यात येणार आहे. मंजूर प्रस्ताव एकूण ४४४.८७ कोटी रुपयांचे आहेत. यात लक्ष्मी वसाहत झोपडपट्टीचा समावेश असल्याने वाहतूककोंडीला आळा बसणार आहे. मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत आयुक्त गणेश देशमुख यांनी प्रकल्पाचे सादरीकरण केले.
पनवेलचे क्षेत्र लवकरच झोपडपट्टीमुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2019 1:03 AM