Panvel: पनवेल शहरातील भारत नगर झोपडपट्टीवासियांची पालिकेवर धडक
By वैभव गायकर | Published: May 12, 2023 03:39 PM2023-05-12T15:39:27+5:302023-05-12T15:40:02+5:30
Panvel News: पनवेल शहरातील पटेल मोहल्ला भारत नगर येथील झोपडपट्टी वासियांनी दि.12 रोजी पालिका मुख्यालयावर धडक देत पालिकेने घरे खाली करण्यासंदर्भात दिलेल्या नोटिसांबाबत प्रशासनाला जाब विचारला.
- वैभव गायकर
पनवेल - पनवेल शहरातील पटेल मोहल्ला भारत नगर येथील झोपडपट्टी वासियांनी दि.12 रोजी पालिका मुख्यालयावर धडक देत पालिकेने घरे खाली करण्यासंदर्भात दिलेल्या नोटिसांबाबत प्रशासनाला जाब विचारला.पावसाळा तोंडावर आला असताना घरे खाली कशी करणार असा या रहिवाशांचा प्रश्न होता.
पालिकेने या झोपडपट्टीवासीयांचा सर्वेक्षण केला आहे.येथील जवळपास 900 जणांना प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत घरे मिळणार आहेत.संबंधित काम सुरु करण्याच्या दृष्टीने पालिकेने या रहिवाशांना घरे खाली करण्याच्या नोटिसा बजावल्या आहेत.याकरिता पालिकेच्या माध्यमातून संबंधितांना घर भाडे देखील देण्याचे आश्वासन देण्यात आले आहे.मात्र ऐन पावसाळ्याच्या तोंडावर आम्हाला भाड्याने घर कुठे मिळेल ? असा प्रश्न करत शेकडोंच्या संख्येने झोपडपट्टी धारक पालिका मुख्यालयासमोर धरणे दिले.प्रशासनाने दिलेल्या नोटिसा मागे घ्याव्यात म्हणुन आम्ही याठिकाणी आलो असल्याचे मेहबूब शेख या मोर्चात सहभागी झालेल्या तरुणाने यावेळी सांगितले.पालिका प्रधानमंत्री आवास योजनेच्या कामाला सुरुवात करण्याच्या तयारीला असताना येथील झोपडपट्टी वासियांनी या कामाला खो घातल्याचे चित्र यामुळे पहावयास मिळत आहे.
संबंधित नागरिकांचा पालिकेवर मोर्चा नव्हता.प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत त्यांच्या शंकांचे निरसन करण्यासाठी आम्हीच त्यांना चर्चेसाठी बोलावले होते.मात्र येताना मोठ्या संख्येने हे नागरिक आले.जमलेल्या नागरिकांच्या प्रतिनिधींशी चर्चा करून त्यांच्या शंकाचे निरसन करण्यात आले.
- कैलास गावडे (उपायुक्त,पनवेल महानगरपालिका )