पनवेल : नावडे फाटा येथील आदित्य बिर्ला कंपनीजवळ मुख्य रस्त्यावरील, बांधकाम सुरू असलेल्या कमानीचा काही भाग कोसळला. आज संध्याकाळी (रविवार, ६ ऑक्टोबर) घडलेल्या या घटनेत दोन जणांना किरकोळ दुखापत झाल्याची माहिती मिळाली आहे. या घटनेमुळे काही काळासाठी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती.नावडे फाटा येथून तळोजा एमआयडीसीत प्रवेश करणाऱ्या मुख्य रस्त्यावर गेल्या चार-पाच महिन्यांपासून कमानीचे बांधकाम सुरू आहे. तळोजा एमआयडीसीचे प्रवेशद्वार म्हणून बांधण्यात येणाऱ्या या कमानीचा काही भाग आज संध्याकाळी कोसळून पडला. सुदैवाने याठिकाणी मोठा अपघात झाला नसला तरी, या घटनेमुळे दोन जणांना किरकोळ दुखापत झाली आहे. मुख्य रस्त्यावर हे काम सुरू असून याठिकाणी गाड्यांची मोठी ये-जा सुरू असते.या अपघातामुळे मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक-जाम सुद्धा झाले होते. गेल्या चार पाच महिन्यांपासून त्या ठिकाणी कमानीचे बांधकाम सुरू असून आज कमानीच्या स्लॅब भरायचे काम सुरू होते. कंत्राटदाराच्या हलगर्जीपणामुळे हा अपघात झाल्याचे, प्रत्यक्षदर्शींचे म्हणणं आहे.
पनवेलमध्ये निर्माणाधीन कमानीचा काही भाग कोसळला, दोन जण जखमी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 06, 2019 9:11 PM