पनवेल बनतेय एज्युकेशन हब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2019 12:34 AM2019-06-22T00:34:55+5:302019-06-22T00:36:02+5:30

उत्तम शैक्षणिक दर्जा आणि सोयी-सुविधांमुळे पनवेलच्या शाळा - कॉलेजांना आज वेगळी ओळख मिळाली आहे.

Panvel Building Education Hub | पनवेल बनतेय एज्युकेशन हब

पनवेल बनतेय एज्युकेशन हब

Next

शहरातील बाजारपेठ, चाकजोड निर्मिती केंद्र, औषधांचे कारखाने, बंदर ही पनवेलची जुनी ओळख आहेच. मात्र शैक्षणिक क्षेत्रातही पनवेल मागे राहिले नाही. उत्तम शैक्षणिक दर्जा आणि सोयी-सुविधांमुळे पनवेलच्या शाळा - कॉलेजांना आज वेगळी ओळख मिळाली आहे. आज याकडे शैक्षणिक हब म्हणून ओळखले जाते.

मुंबई आणि पुणे या दोन महानगरांच्या मध्यभागी पनवेल असल्याने पनवेलचा चौफेर बदल अनुभवयाला मिळतोय. त्यातल्या त्यात नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे हे महानगर जगाच्या नकाशावर अधोरेखित होत आहे. त्यात पनवेलमधील सिडको वसाहती स्मार्ट करण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न सुरू आहे. याच कारणाने पनवेल परिसरात खासगी शिक्षण संस्थांनी या परिसरात शैक्षणिक संकुल सुरू केले. वास्तविक पाहता पनवेलचा शैक्षणिक स्तर कायम वर राहिला आहे. रायगड जिल्हा परिषद आणि पनवेल महानगरपालिका शाळांबरोबरच कोकण आणि सुधागड एज्युकेशनचे योगदान खूप मोठे आहे. गेल्या काही वर्षात पनवेल, नवीन पनवेल, कळंबोली, कामोठे परिसरात खासगी शिक्षण संस्था आल्या आहेत. त्यातल्या त्यात इंग्रजी माध्यमांच्या शाळांची संख्याही वाढली आहे. सेंट जोसेफ, कारमेल, महात्मा स्कूल, डी.ए. व्ही पब्लिकस्कूल, बालभारती या शाळांमध्ये प्रवेश घेण्याकरिता पालकांची चढाओढ लागते. नर्सरीच्या अ‍ॅडमिशनसाठी थेट मंत्रालयातून फिल्डिंग लावली जाते. म्हणजे या शाळांना किती महत्त्व प्राप्त झाले आहे याची प्रचिती येते.

पूर्वी शिक्षण म्हटले की चटकण पुणे हे नाव तोंडात यायचं याचे कारण हे शहर शिक्षणाचे माहेरघर आणि राज्याची शैक्षणिक राजधानी आहे. मात्र आता त्याच तोडीचे एज्युकेशन म्हणून खारघरचे नाव पुढे आले. सायबर सिटी म्हणून या शहराचे नाव आहेच, आता शिक्षण संस्था येथे एकटवल्या असल्याने वेगळे ग्लॅमर आले आहे. भारती विद्यापीठ, एस.सी. पाटील, जी. डी. पोळ, आयटीएम, सरस्वती यासारखे महत्त्वाचे कॉलेज खारघरमध्ये आहेत. येथे देशभरातून विद्यार्थी शिकायला येत आहेत. तसेच या शहरात फॅशन डिझाइनचे कॉलेज आहे. याशिवाय दर्जेदार माध्यमिक उच्च माध्यमिक शाळा या सिटीचे वैशिष्ट्य म्हणावे लागेल. वैद्यकीय, अभियांत्रिकी, मॅनेजमेंट , नर्सिंग, आर्किटेक्चरचे शिक्षण येथे मिळते. लाखो विद्यार्थी या अभ्यासक्रमाचे धडे घेत आहेत. याशिवाय सी.के.टी., पिल्लाई, एमजीएम ही महाविद्यालये अनुक्रमे खांदा वसाहतीत आहेत. विसपुते शैक्षणिक संकुलात विविध कोर्सेस आहेत, त्याचबरोबर एस.पी. मोरे महाविद्यालयात हॉटेल मॅनजमेंट करण्याची सुविधा उपलब्ध आहे. आता एज्युकेशनचे वारे थेट पळस्पे, शिरढोणपर्यंत पोहचलेय येथे शिवाजी महाराज विद्यापीठ सुरू झाले आहे.

पळस्पे येथे सर्वात अगोदर बालाजी न्यू इंग्लिश स्कूल सुरू झाले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी चांगली इंग्रजी माध्यमाची शाळा सुरू झाल्याने आजूबाजूची मुले येवू लागली त्यांच्यासाठी चांगली सुविधा निर्माण झाली. आता या पट्ट्यात डीपीएस, एमएनआर या शाळा आल्या. भविष्यात या भागात आणखी शिक्षण संस्था येतील याचे कारण पळस्पे भविष्यात मोठे जंक्शन होवू पाहतेय. शेंडूगला वेलफ्रेड कॉलेज तसेच स्कूल गेल्या काही वर्षांपासून सुरू आहे.

एकंदरीतच पनवेलला विमानतळ, नैना, पुष्पकनगर आले असल्याने त्यामुळे गृहनिर्मिती वाढली, पर्यायाने शैक्षणिक संस्था वाढल्या त्यामुळे विद्यार्थ्यांना मुंबई, पुणे या महानगराऐवजी येथेच शिक्षणाचे अनेक पर्याय मिळाले. म्हणून पनवेल एज्युकेशन हब बनतेय.

Web Title: Panvel Building Education Hub

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.