सूरतच्या धर्तीवर उभारले जाणार पनवेलचे बस आगार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2018 02:37 AM2018-05-20T02:37:15+5:302018-05-20T02:37:15+5:30
२३० कोटी खर्च : १७५०० चौरस मीटरवर अद्ययावत बसस्थानक
पनवेल : राज्य परिवहन महामंडळाच्या पनवेल डेपोमधील समस्या कायमस्वरूपी सुटणार आहेत. सूरतच्या धर्तीवर नवीन डेपो उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. २३० कोटी रुपये खर्च करून १७५०० चौरस मीटर भूखंडावर अद्ययावत बसस्थानक उभारणार आहे.
पनवेल हे सिडको कार्यक्षेत्रामधील एकमेव एसटी आगार आहे. बसस्थानकाला समस्यांचा विळखा पडला आहे. पावसाळ्यात डेपो खड्डेमय होत असतो. इतरही समस्या मोठ्या प्रमाणात आहेत. प्रवाशांची होणारी गैरसोय थांबविण्यासाठी अत्याधुनिक एसटी डेपो उभारण्यासाठी शासनस्तरावर पाठपुरावा सुरू आहे. गुजरातमधील सूरत बस डेपोच्या धर्तीवर अद्ययावत एसटी आगार बनविण्याचे निश्चित केले आहे. यासाठी बांधकामाची निविदा मंजूर करण्यात आली आहे.
अधिकाऱ्यांशी चर्चा
येथील कामाची आमदार प्रशांत ठाकूर यांनी पाहणी केली. बांधकाम पूर्ण होईपर्यंत पर्यायी व्यवस्थेसंबंधी चर्चा करण्यासाठी गुरु वारी आगारात महामंडळाचे कार्यकारी अभियंता विनित कुलकर्णी यांच्याबरोबर चर्चा केली. या वेळी प्रवासी संघटनेचे अध्यक्ष डॉ. भक्तिकुमार दवे, सरचिटणीस श्रीकांत बापट, के. जी. म्हात्रे आदी उपस्थित होते.
एसटी आगारात आधुनिक सुविधा
पनवेल आगारात दररोज ४२०० एसटी गाड्या ये-जा करीत असतात. आजमितीस आगारात २६ फलाट आहेत. नवीन प्रस्तावित स्थानकात ३० फलाट असणार आहेत. या स्थानकात प्रवाशांसाठी आधुनिक सुविधा उपलब्ध केल्या जाणार आहेत. यासाठी संबंधित ठेकेदाराला ३० महिन्यांची मुदत देण्यात आली असून, प्रत्यक्ष कामाला पावसाळ्यानंतरच सुरु वात केली जाणार आहे.
आतापर्यंत या स्थानकाच्या कामाला पाच, सात वर्षे उशीर झालेला असल्याने, काम मुदतीत पूर्ण करण्याचे निर्देश अधिकाºयांन दिलेले आहेत. हे काम ठेकेदाराने मुदतीपेक्षा कमी वेळेत पूर्ण केल्यास त्यास एसटीतर्फे प्रोत्साहन बक्षीस देण्यात यावे.
- प्रशांत ठाकूर,
आमदार