मयूर तांबडे / पनवेलपनवेल महानगरपालिकेची निवडणूक जाहीर झाल्याने प्रचारला वेग आला आहे. २४ मे रोजी पालिकेची निवडणूक होत आहे. निवडणुका जाहीर झाल्याने पक्ष प्रवेशालादेखील वेग येणार आहे. भाजपा, शेकाप व शिवसेनेत इच्छुक उमेदवारांची संख्या जास्त असल्याने उमेदवार नाराज होऊन अन्य पक्षात प्रवेश करण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे पक्षात होणारी बंडाळी पदाधिकाऱ्यांना थांबवावी लागणार आहे.गेले चार ते पाच महिने आस लागून राहिलेली पनवेल महापालिकेची निवडणूक अखेर जाहीर झाली आहे. त्यामुळे अनेकांनी सुटकेचा नि:श्वास टाकला आहे. मे महिन्यात निवडणूक होणार असल्याचे बोलले जात होते. अखेर महापालिका निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. २४ मे रोजी महापलिकेसाठी मतदान होणार आहे, तर २६ मे रोजी मतमोजणी पार पडणार आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्ष प्रवेशाला वेग येणार असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे साऱ्याच पक्षांना बंडोबांना शांत करण्याचे प्रयत्न करावे लागणार आहेत. बंड होऊ नये म्हणून सारेच पक्ष काळजी घेत आहेत. गेल्या महिन्यात रिपब्लिकन पार्टीचे नवीन पनवेल शहराध्यक्ष प्रभाकर कांबळे, तालुकाध्यक्ष मोहन गायकवाड, भाजपाचे मयुरेश खिस्मतराव, प्रकाश खानावकर, भारिपचे कल्पेश तोडेकर यांनी शेतकरी कामगार पक्षात प्रवेश केला आहे. तर राष्ट्रवादीचे रामदास शेवाळे, कामोठे शेकापचे शहराध्यक्ष संतोष म्हात्रे, माजी ग्रामपंचायत सदस्य विजय चिपळेकर यांनी भाजपामध्ये तर शिवसेनेचे संतोष उरणकर यांनी गेल्या महिन्यात राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. मात्र, त्यांनी नुकताच भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आहे.निवडणूक जाहीर झाल्याने पनवेलमधील सर्व राजकीय पक्षांच्या तथा नेत्यांच्या हालचालीना वेग आला आहे. त्यामुळे अनेक चर्चा-परिसंवादांना ऊत आला आहे. राजकीय आखाड्यात टिकून राहण्यासाठी ज्या पदाधिकाऱ्यांना किंवा कार्यकर्त्यांना संधी मिळालेली नाही. ते इतर पक्षांत पक्ष प्रवेश करण्याच्या तयारीत आहेत. निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी इतरत्र जे खुले गट आहेत त्यात सध्या उमेदवारीची चाचपणी सुरू आहे. मात्र, तेथील इच्छुकांची भाऊगर्दी असल्याने, त्यांचा अडसर दूर करण्यासाठी प्रलोभने दाखवून, तेथे स्थानिक इच्छुकांसह पदाधिकाऱ्यांची निवडणूक लढवण्याची प्रबळ इच्छा उचबंळून आलेली आहे. त्यामुळे आधीच इच्छुकांची भाऊगर्दी असलेल्या त्या गटात नव्याने येणाऱ्यांची स्पर्धा निर्माण होणार आहे.
पनवेलमध्ये पक्षांतराला वेग
By admin | Published: April 29, 2017 1:52 AM