पनवेल शहरात उभी राहतेय सामाजिक-सांस्कृतिक चळवळ - रवींद्र चव्हाण
By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2019 11:24 PM2019-08-23T23:24:06+5:302019-08-23T23:25:43+5:30
पनवेलमधील या सोहळ्याला पनवेलकरांनी भरभरून दाद दिली. विविध क्षेत्रातील मान्यवरांचा या सोहळ्यात पनवेल गौरव पुरस्काराने सन्मान करण्यात आला. या वेळी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन देखील करण्यात आले होते.
पनवेल : शहर नावारूपाला येत असताना प्रत्येक नागरिकाचा हातभार लागणे गरजेचे आहे. ‘पनवेल गौरव’ कार्यक्रमाचे आयोजन करणाऱ्या लोकमतचे कौतुक करावे तेवढे कमी आहे. डोंबिवलीत सांस्कृतिक चळवळ निर्माण झाली होती. तशीच चळवळ पनवेलमध्ये उभी राहत आहे. रायगडचा पालकमंत्री म्हणून मला या कार्यक्रमात सहभागी होता आले ही आनंदाची बाब असल्याचे गौरवोद्गार राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी गुरुवारी फडके नाट्यगृहात आयोजित पनवेल गौरव पुरस्काराच्या वितरणाच्या वेळी काढले.
पनवेलमधील या सोहळ्याला पनवेलकरांनी भरभरून दाद दिली. विविध क्षेत्रातील मान्यवरांचा या सोहळ्यात पनवेल गौरव पुरस्काराने सन्मान करण्यात आला. या वेळी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन देखील करण्यात आले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुणाल रेगे यांनी केले. पनवेलमधील विविध क्षेत्रातील मान्यवर या सोहळ्याचा मनमुराद आनंद घेण्यासाठी उपस्थित होते. या वेळी सांस्कृतिक, शैक्षणिक, सामाजिक, संगीत, उद्योग आदी क्षेत्रातील एकूण २६ मान्यवरांचा ‘पनवेल गौरव’ने सन्मान करण्यात. या कार्यक्रमाला राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांच्यासह माजी खासदार रामशेठ ठाकूर, पनवेलचे आमदार तथा सिडकोचे अध्यक्ष प्रशांत ठाकूर, पनवेल महानगर पालिकेचे आयुक्त गणेश देशमुख, सभागृह नेते परेश ठाकूर, वाय. टी. देशमुख, अरुण भगत, जिल्हा परिषद सदस्या रत्नप्रभा घरत, नगरसेविका दर्शना भोईर, नगरसेविका मुग्धा लोंढे आदींसह मोठ्या संंख्येने शहरातील नागरिक उपस्थित होते.
‘लोकमत’ने राबविलेला हा कार्यक्रम खरोखर उत्कृष्ट आहे. भविष्यात अशाप्रकारचा सोहळा हा नाट्यगृहात आयोजित न करता मोठ्या मैदानात आयोजित करावा. शहर नावारूपाला आणायचे असेल तर प्रत्येक व्यक्तीचा त्यासाठी हातभार लागायला हवा. ‘लोकमत’ने याकरिता पुढाकार घेतला असून यामध्ये मला सहभागी होता आले याचा मला आनंद आहे .
-रवींद्र चव्हाण,
राज्यमंत्री
या पुरस्कार सोहळ्यासाठी श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक मंडळाला सहभागी करून घेतले याबद्दल आम्ही ‘लोकमत’चे आभारी आहोत. ज्या पद्धतीने राज्यमंत्री चव्हाण यांनी आम्ही डोंबिवलीकर ही संस्कृती जपली आहे. त्याच धर्तीवर आम्ही देखील मी पनवेलकर म्हणून पनवेलची मान ताठ राहील याकरिता कार्यरत राहू. ‘लोकमत’ने सन्मानित केलेल्या सर्व विजेत्यांना शुभेच्छा.
-रामशेठ ठाकूर,
माजी खासदार
या सोहळ्याद्वारे घरच्या माणसाने, घरच्या ठिकाणी पाठीवर दिलेली थाप आहे. सामाजिक बांधिलकी जपणारा माणूस रामशेठ ठाकूर आणि कुटुंबीय आहेत.‘लोकमत’ नेहमीच पत्रकारितेतील आपले वेगळे स्थान टिकवून आहे. या कार्यक्रमात सहभागी होताना आनंद वाटला. पुरस्कार विजेत्या सर्व मान्यवरांना शुभेच्छा.
- गणेश देशमुख,
आयुक्त, पनवेल