पनवेल न्यायालयाचा पार्किंग प्रश्न चिघळणार
By admin | Published: December 22, 2016 06:47 AM2016-12-22T06:47:08+5:302016-12-22T06:47:08+5:30
पनवेल न्यायालयाच्या इमारतीचे काम पूर्ण होऊन ते आता संपुष्टात देखील आले आहे. मात्र याठिकाणच्या पार्किंगच्या अभावामुळे
पनवेल : पनवेल न्यायालयाच्या इमारतीचे काम पूर्ण होऊन ते आता संपुष्टात देखील आले आहे. मात्र याठिकाणच्या पार्किंगच्या अभावामुळे या न्यायालयाच्या नूतन इमारतीच्या उद्घाटनाचा विषय रेंगाळला आहे. विशेष म्हणजे पार्किंग प्रश्नावरून दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर न्यायमूर्ती अभय ओक यांनी नाराजी व्यक्त केली आहे. तसेच राज्याच्या सचिवांना यासंदर्भात लवकरात लवकर तोडगा काढण्याचे आदेश दिले आहेत.
न्यायालयाच्या आदेशानंतर शासकीय स्तरावर त्वरित हालचाली होवून या इमारतीची पाहणी केली. या पाहणी नंतर न्यायालयासमोरील आठ मीटरच्या रस्त्यातील अडीच मीटरचा रस्ता पार्किंगसाठी ठेवण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला. मात्र या प्रस्तावाला शिवसेनेने प्रखर विरोध दर्शविला आहे. बुधवारी महापालिका आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांची भेट घेत शिवसेना शिष्टमंडळाने या प्रस्तावाला विरोध केला आहे. अरु ंद असलेल्या रस्त्याला आणखी लहान करू नयेत. यामुळे शहरात पार्किंगचा विषय आणखी चिघळेल, अशी भीती शहर अध्यक्ष प्रथमेश सोमण यांनी व्यक्त केली आहे. ११ कोटी रूपये खर्चून उभारलेल्या या न्यायालयात केवळ ४0 वाहनांची पार्किंग व्यवस्था उपलब्ध आहे. त्यामुळे याठिकाणी पार्किंगचा मोठा प्रश्न निर्माण होणार आहे. यासंदर्भात न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. २३ डिसेंबर रोजी या याचिकेवर सुनावणी होणार आहे. पालिका आयुक्त सुधाकर शिंदे यांना यासंदर्भात निवेदन देऊन अडीच मीटरचा प्रस्ताव रद्द करण्याची विनंती करण्यात आली आहे. संबंधित प्रस्ताव रद्द न झाल्यास आम्ही आंदोलन करू, असा इशारा शिवसेनेच्या शिष्टमंडळाने दिला आहे. (प्रतिनिधी)